कोरोनामध्येही धावून येतोय शेजारधर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:48+5:302021-04-11T04:37:48+5:30
बदलत्या काळानुसार कुटुंबे छोटी होत गेली. अनेकांच्या घरी नवरा-बायको आणि मुले एवढेच सदस्य असतात. नवरा-बायकोचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ...
बदलत्या काळानुसार कुटुंबे छोटी होत गेली. अनेकांच्या घरी नवरा-बायको आणि मुले एवढेच सदस्य असतात. नवरा-बायकोचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर काय करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. त्यातून एकाची प्रकृती गंभीर असेल तर त्याला रुग्णालयात दाखल होण्याशिवाय पर्याय नसतो. किंवा गंभीर स्वरूपाची लागण झालेली नसल्यास प्रत्येकालाच बेड मिळतो असेही नाही. अशा रुग्णांना घरीच आयसोलेटेड होण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. जवळचे नातेवाईक दूरगावी असतात. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आई-बाबांबरोबर लहान मुलाला ठेवणे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी आपल्या मुलाला कोठे सोडायचे, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो.
वास्तविक, ही मुले आई-वडिलांच्या सान्निध्यात आलेली असतात. त्यामुळे त्यांना घरी घेतले तर त्यांच्याबरोबर खेळल्यामुळे आपल्या मुलांनाही धोका होऊ शकतो, अशी भीती कोणालाही वाटणे साहजिकच आहे. मात्र ते निगेटिव्ह आल्यानंतरही मदतीसाठी हात वर करणारेसुद्धा असतात. तर काही जण क्षणाचाही विचार न करता “तुमच्या मुलाला आमच्याकडे सोडा. आम्ही बघून घेतो पुढे काय करायचे ते,” हे एकच वाक्य सांगून मोठा प्रश्न सोडविला जातो.
कोरोनाबाधितांसमोरील समस्यांची मालिका काही केल्या संपता संपत नाही. मुलांच्या राहण्याचा प्रश्न सुटला असला तरी या रुग्णांना घरातून बाहेर पडणं शक्य होत नाही. घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये स्वयंपाक करण्याचाही त्राण उरत नाही. अशा रुग्णांना दोन वेळचं जेवण पोहोचवणं आणि त्यांच्या चहा-पाण्याची सोय करण्याचं काम काही माणसं बिनधास्तपणे पार पाडत आहेत.
चौकट...
आज तुमच्यावर आली...
आपल्या शेजारचे पॉझिटिव्ह आलेले आहेत, हे समजल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. तरीही स्वतःला सावरून काही जण मदतीचा हात पुढे करून शेजारधर्म निभावतात. बाधितांच्या मुलांचा सांभाळ करणे, रुग्णांना जेवण, चहा, नाश्ता पुरवतात. अनेकदा मदतीच्या नावाखाली त्रास देणे म्हणजे रुग्णांना अवघडल्यासारखे वाटते. त्यामुळे ते मदत घेण्यास संकोच करतात. अशावेळी “आज तुमच्यावर वेळ आली, उद्या आमच्यावर येऊ शकते. आम्ही असताना तुम्ही काळजी करू नका,” असा डायलॉग मारून रुग्णाचे तोंड बंद केले जाते.
कोट :
एखादा कावळा जखमी होऊन पडला तर थवा जमा होतो. त्यातून त्या कावळ्याला उडण्याचे बळ मिळते. आपण तर माणसे आहोत. शेजाऱ्यांना कोरोना झालाय म्हणून वेगळे पाडणे माणुसकीला धरून नाही. त्यांना मदत केली, आधार दिला तर निम्मा आजार पळून जाईल.
- प्रशांत मनवे,
सातारा.