Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:13 PM2022-06-29T18:13:56+5:302022-06-29T18:15:31+5:30

मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत.

Neither Shambhuraj Desai nor Mahesh Shinde has ever tried to increase Shiv Sena | Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा

Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा

Next

दीपक शिंदे

माय मरो आणि मावशी जगो... अशी आपल्याकडे पुरातन म्हण आहे. आई जेवढी काळजी घेते त्याच्यापेक्षा अधिक काळजी मावशी घेते. त्यामुळे एखाद्या संकटात आईची साथ सुटली तरी मावशीचा आधार मोलाचा ठरत असतो. अशीच काहीशी अवस्था बंडखोर शिवसैनिकांची झाली आहे. मातृसंस्था असलेल्या शिवसेनेला सोडून भाजपच्या जवळ गेलेल्या या शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी घेतलेली ही भूमिका कोणालाच पटलेली नाही. आई सोबत असताना मावशीशी जवळीक करणाऱ्या या नेत्यांनी पूतनामावशीशी तर जवळीक केली नाही ना, अशी शंकादेखील व्यक्त केली जात आहे. हिंदुत्वाचा विषय म्हणून बाजूला जाणाऱ्या नेत्यांनी आत्तापर्यंत हिंदुत्वासाठी काय केले. महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांनी तर याचे उत्तर नक्कीच दिले पाहिजे.

आमच्या मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत. पदाला चिकटून बसायचे, त्या पदाचा मान, सन्मान मिळवायचा आणि आम्हाला काहीच करता आले नाही असे म्हणायचे म्हणजे आपली हतबलता स्पष्ट करण्यासारखे आहे. आपल्याला संधी देऊनही काहीच जमले नाही असा तर त्याचा अर्थ होत नाही ना....

शंभूराज देसाई असोत किंवा महेश शिंदे या दोन्ही आमदारांनी कधीही शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न केला नाही, असे त्यांचेच कार्यकर्ते खासगीत आणि उघडपणे देखील सांगत आहेत. उलट त्यांनी आपला गट तयार केला. कधीही बाहेर पडावे लागले तर अडचणी वाढायला नकोत यासाठी त्यांनी या गटाच्या माध्यमातून आपली ताकद वाढविण्यासाठीच कायम प्रयत्न केले. त्यामुळेच आज त्यांच्यासोबतचे गट शिवसेनेच्या विरोधात बाहेर पडले आहेत. मूळ शिवसैनिक हा कधीही पक्ष सोडून इतर कोणाच्या सोबत जाणार नाही. त्याची बांधिलकी ही पक्षाशीच कायम राहणार. त्यामुळे शिवसेनेला कितीही हादरे बसले आणि कितीही नेते बाहेर पडले तरी शिवसेना मजबूत राहिली आणि राज्यात सत्तेवर देखील आली.

शिवसेनेला विचारात घेतल्याशिवाय कोणत्याच पक्षाला राज्यात आपले सरकार बनविता येणार नाही, एवढी ताकद शिवसेनेने निर्माण केली आहे. याला एक पिढी द्यावी लागली आहे. त्या पिढीने शिवसेना मजबूत बांधली असली तरी बाह्यशक्ती या कायम त्रासदायकच ठरत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम प्रत्येक पिढीला करावे लागते. अन्यथा, थोडे जरी कमी पडलो तरी अशी अवस्था होते.

उद्धव ठाकरे हे आपल्याच पक्षातील नेत्यांना वेळ देण्यात कमी पडले असतील ही बाब मान्य करायला हरकत नाही. बराच काळ ते आजारी असल्यामुळे ही गोष्ट गृहीतच धरली आहे. तरीदेखील राज्यमंत्री म्हणून संधी देऊन पाच मंत्रिपदे देऊन काहीच करता आले नाही, अशी जर अगतिकता व्यक्त करणार असाल तर ती कोणीच ऐकून घेणार नाही. जे लोक आपल्या मतदारसंघात कामे करता आली नाहीत असे म्हणत आहेत, त्यांच्या मतदारसंघात ५० काय अडीचशे कोटींची कामे झाली आहेत. हे पैसे कोठून आणले याचाही जाब लोक विचारणार आहेत.

कोरेगावसाठी ४० कोटीची योजना मंजूर, विशेष निधीतून कोरेगावसाठी १५ कोटी, कोरेगावातील २५ गावांना पाच कोटी, कोरेगाव मतदारसंघात जलसंधारणासाठी ३७ कोटी, जलसंधारणासाठी साडेतीन कोटी ही महेश शिंदे यांची पोस्टरबाजी आहे. जर मतदारासंघासाठी निधीच मिळत नाही म्हणता तर मग ही कामे कोठून आणली. कशातून पैसे खर्च करण्याचे नियोजन केले. अशीच परिस्थिती शंभूराज देसाई यांची आहे. दर दहा पावलांवर यांच्या विकासकामांचे बोर्ड लावून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची सवय लागली आहे की काय, असा सवाल कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

दोन्ही नेत्यांनी सेना शाखांची माहिती द्यावी

शिवसेनेसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटना कशी वाढवायची आणि त्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव आहे. पण, ज्यांनी एकही शाखा काढली नाही, शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत, ते आम्ही अजूनही शिवसेनेत आणि शिवसेनेचे असल्याचे म्हणत आहेत.

Web Title: Neither Shambhuraj Desai nor Mahesh Shinde has ever tried to increase Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.