नेमा प्राधिकरण अधिकारी.. अन्यथा थाटू मंडई !

By admin | Published: June 27, 2016 11:05 PM2016-06-27T23:05:03+5:302016-06-28T00:36:11+5:30

शिवेंद्रसिंहराजेंचा इशारा : जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभाराबाबत सातारकरांमधून संताप

Nema Authority Officer .. Otherwise Thandi Mandai! | नेमा प्राधिकरण अधिकारी.. अन्यथा थाटू मंडई !

नेमा प्राधिकरण अधिकारी.. अन्यथा थाटू मंडई !

Next

सातारा : ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सातारकरांना बसत आहे. सातारा शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे वर्षानुवर्षे रखडलेले काम, पाच-पाच महिने गळती निघत नाही. पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब, यामुळे प्राधिकणाबाबत सातारकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. गेल्या पाच वर्षांत कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता प्राधिकरणाला मिळाला नाही. येत्या दहा दिवसांत प्रशासनाने प्राधिकरणाच्या कार्यालयाला एक कर्तव्यदक्ष आणि पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता द्यावा; अन्यथा प्राधिकरणच्या आवारात भाजीमंडई स्थापन करून जागेचा सदुपयोग करू,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरातील काही भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. तसेच सातारा शहरासाठी मंजूर झालेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे कामही प्राधिकरणामार्फत चालू असून, हे काम अद्यापही सुरूच आहे. प्राधिकरणाला सक्षम आणि पूर्णवेळ अधिकारी मिळत नसल्याने वर्षानुवर्षे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
प्राधिकरणाचा कारभार सुधारावा, यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. मात्र, त्यांच्या कारभारात तसूभरही फरक पडलेला
नाही. प्राधिकरण कार्यालयाचा काहीही उपयोग होत नाही, उलट सर्वांच्याच डोक्याला ताप झाला आहे. त्यामुळेच प्राधिकरणाचे कार्यालय बंद करा, अशी मागणी आपण केली
होती.
‘प्राधिकरणाचे कामकाज समाजाभिमुख आणि दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाने तातडीने एक सक्षम कार्यकारी अभियंत्याची नेमणूक सातारा कार्यालयासाठी करावी. येत्या दहा दिवसांत अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास निषेध म्हणून प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात आम्ही भाजीमंडई भरवू.
तसे पाहिले तर, प्राधिकरणाचा काहीही उपयोग होत नसल्याने कार्यालयाच्या जागेचा तरी, नागरिकांसाठी उपयोग होईल. आमच्या इशाऱ्याची दखल प्रशासनाने न घेतल्यास प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात ११ व्या दिवशी भाजीमंडई सुरू केली जाईल,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)


प्राधिकरणला एक गळती काढायला
पाच महिने!


उत्तरे आम्हाला द्यावी लागतात...
प्राधिकरण कार्यालयाला एक सक्षम प्रमुख आणि पूर्णवेळ अधिकारी मिळावा, अशी मागणीही वारंवार प्रशासनाकडे केली आहे. प्रत्यक्षात मात्र अधिकाऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु असल्याचे दिसत असून प्राधिकरण कार्यालयाचा कारभार सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप असून एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या प्रश्नाला आम्हाला उत्तरे द्यावी लागत आहेत.

Web Title: Nema Authority Officer .. Otherwise Thandi Mandai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.