स्वातंत्र्यसैनिक चुलत्याच्या पेन्शनसासाठी पुतण्याचा लढा... स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा
By नितीन काळेल | Published: August 13, 2023 07:23 PM2023-08-13T19:23:18+5:302023-08-13T19:23:18+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी येऊन आत्मदहन करणार असल्याचे सांगलीकर तरूणाने सांगितले आहे
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेऊनही शासनाकडून पेन्शन मंजूर नाही. आता त्यांच्या मृत्यूनंतरतरी वारस पत्नीला पेन्शन मिळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त शिगावमधील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक रंगराव बारवडे यांचा पुतण्या नितीन बारवडेंनी लढा सुरू केला आहे. यासाठी १५ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या दरे गावी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनकेजण सहभागी झाले होते. १९४२ मधील लढ्यात हजारो लोकांनी सर्वस्व अर्पण केले. त्यापाठीमागे देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करणे हाच हेतू होता. यामधील एक सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त शिगाव (ता. वाळवा) येथील रंगराव विठ्ठल बारवडे हे एक होते. स्वातंत्र्यानंतर या स्वातंत्र्यसैनिकांसाठी शासनाने पेन्शन सुरू केली. याचा शेकडो स्वातंत्र्यसैनिकांना आधार झाला. मात्र, रंगराव बारवडे यांनी १९८४ मध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शनसाठी अर्ज केला होता. यासाठी वारंवार पाठपुरावा करुनही तो मंजूर झाला नाही.
असे असतानाच १९९७ मध्ये स्वातंत्र्यसैनिक रंगराव बारवडे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आता पत्नी अनुसया बारवडे (वय ८७) व इतर कुटुंबीय आहे. स्वातंत्र्यसैनिक बारवडे यांचे निधन झाले असलेतरी त्यांच्या पत्नीला ही पेन्शन सुरू व्हावी यासाठी पुतणे नितीन विश्वासराव बारवडे हे प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत शासनस्तरावर अनेकवेळा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे नितीन बारवडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे.