उन्हाळी हंगामासाठी नेरचे पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:48+5:302021-03-04T05:13:48+5:30
वार्ताहर : खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन नेर धरणातून उन्हाळी हंगामासाठी सोमवारी पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात ७५ टक्के ...
वार्ताहर :
खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन नेर धरणातून उन्हाळी हंगामासाठी सोमवारी पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात ७५ टक्के पाणीसाठा असल्याने एक महिना सलग पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नेर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आणि सर्व कॅनॉलची दुरुस्ती करूनही रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज आले नाहीत. आता उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांनी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी नेर धरणातून थेट येरळा नदीत तसेच नेर मुख्य कालव्यातून राम ओढा आणि खातगुण येथील नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे.
या पाण्याचा नेर, पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, भांडेवाडी, खटाव, सिध्देश्वर कुरोली आणि भुरकवडी या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
(चौकट)
अर्ज भरून सहकार्य करा
उन्हाळी हंगामासाठी नेर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेल्या पाण्याचा लाभ बागायती क्षेत्राला होणार आहे. या पाण्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढणार आहे. येरळा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते आणि पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक अमोल लेंभे यांनी केले आहे.
फोटो : ०३ पुसेगाव
पाटबंधारे विभागाकडून सोमवारी नेर धरणातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. (छाया : केशव जाधव)