पोलिस ठाण्याची इमारत नवी; टेबलं जुनीच !
By admin | Published: March 26, 2017 10:09 PM2017-03-26T22:09:03+5:302017-03-26T22:09:03+5:30
पाडव्याचा मुहूर्त : कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यासह उपअधीक्षक कार्यालय होणार स्थलांतरित
कऱ्हाड : येथील तालुका पोलिस ठाणे व उपअधीक्षक कार्यालयासाठी सर्व सोयीसुविधा असलेली नवी इमारत उभी राहिली आहे. मात्र, आता पैसेच शिल्लक नसल्याने इमारतीमधील फर्निचरचे काम रखडणार आहे. इतर सर्व कामे पूर्ण झाली असताना फक्त फर्निचरसाठी स्थलांतर थांबवावे लागण्याची शक्यता होती; पण या नव्या इमारतीत जुने फर्निचर वापरून कामकाज सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी गुढी पाडव्याचा मुहूर्त काढण्यात आला असून, इतर किरकोळ कामे गतीने सुरू आहेत.
कऱ्हाड शहर व तालुका पोलिस ठाण्याची इमारत पूर्वीपासून स्वतंत्र आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत उपअधीक्षक कार्यालयाचे कामकाज शहर पोलिस ठाण्याच्या इमारतीमधून चालत होते. मात्र, त्यानंतर उपअधीक्षक कार्यालय बसस्थानकानजीकच्या प्रांत कार्यालय इमारतीत स्थलांतरित झाले. संबंधित इमारतीत सध्या उपअधीक्षक कार्यालय कार्यरत आहे.
दरम्यान, जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले तालुका पोलिस ठाणे नव्या इमारतीचे काम सुरू करताना जुन्या न्यायालय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. गत तीन वर्षांपासून तालुका पोलिस ठाणे मार्केट यार्डमध्ये
कार्यरत आहे. पंचायत समितीसमोरील जुन्या तहसील कार्यालय व
तालुका पोलिस ठाण्याची
इमारत पाडून त्याठिकाणी प्रशासकीय इमारत उभी करण्यात आली
आहे. तसेच तालुका पोलिस ठाणे व उपअधीक्षक कार्यालयासाठीही
स्वतंत्र इमारत उभारण्यात आली
आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत कऱ्हाड शहरात शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, तालुका पोलिस ठाण्याची इमारत, बसस्थानक आदी महत्तवपूर्ण विकासकामांना मंजुरी दिली. तसेच संबंधित इमारतींचा निधीही तत्काळ त्या-त्या खात्याकडे वर्ग करण्यात आला.
प्रशासकीय इमारत तसेच तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. सध्या बसस्थानक इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. तर विश्रामगृह, प्रशासकीय इमारतीचे काम निधीअभावी रखडले आहे. तालुका पोलिस ठाण्याची इमारत व प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. सुमारे दीड कोटी खर्चून पोलिस ठाण्याची आकर्षक इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप अंतर्गत फर्निचरचे काम बाकी आहे. फर्निचरसाठी सुमारे ४० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, निधीच शिल्लक नसल्याने फर्निचरच्या कामासाठी विलंब लागला आहे.
गुढी पाडव्याला या इमारतीत तालुका पोलिस ठाणे व उपअधीक्षक कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जुनेच साहित्य या इमारतीमध्ये आणण्यात येणार आहे. टेबल, खुर्च्या, कपाट यासह इतर सर्व साहित्य जुन्या इमारतीमधून आणून येथे ठेवण्यात येणार आहे. पुढील निधी उपलब्ध होऊन फर्निचरचे काम पूर्ण होईपर्यंत उपलब्ध साहित्याचाच वापर करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. (प्रतिनिधी)