‘किसन वीर’चा नवा मापदंड
By admin | Published: May 22, 2015 09:44 PM2015-05-22T21:44:55+5:302015-05-23T00:36:07+5:30
अध्यक्षपदी मदन भोसले: उपाध्यक्षपदी गजानन बाबर यांची निवड
भुर्इंज : ‘भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे मदन भोसले आणि उपाध्यक्षपदी गजानन बाबर यांची तिसऱ्यांदा फेरनिवड झाली. दरम्यान, मदन भोसले यांनी सभासदांनी ज्या विश्वासाने कारखान्याची सत्ता पुन्हा आमच्या ताब्यात दिली, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता किसन वीर उद्योग समूहाचा राज्यातील साखर उद्योगात नवा मापदंड निर्माण करू,’ अशी ग्वाही दिली.
अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत मदन भोसले यांचा अध्यक्षपदासाठी व गजानन बाबर यांचा उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्याचे खेबुडकर यांनी सांगितले.
अध्यक्षपदासाठी मदन भोसले यांचे नाव सीए सी. व्ही. काळे यांनी सुचविले त्यास चंद्रकांत इंगवले यांनी अनुमोदन दिले, तर उपाध्यक्षपदासाठी गजानन बाबर यांचे नाव रतनसिंह शिंदे यांनी सुचविले त्यास नंदकुमार निकम यांनी अनुमोदन दिले. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अध्यासी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सत्कार केला.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने चोवीस ते पंचवीस हजार मतांच्या फरकाने २१-० असा दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असताना शिवसेनेच्या अट्टाहासामुळे सभासदांवर ही निवडणूक लादली गेली होती. राज्याचे लक्ष लागलेली किसन वीर कारखान्याची ही निवडणूक मदन भोसले यांनी एकहाती जिंकून शिवसेनेला सणसणीत चपराक दिलेली होती. सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिटही या निवडणुकीत जप्त झाले होते.
मदन भोसले म्हणाले, ‘गेल्या बारा वर्षांत सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासद व कारखान्याचा कामगार केंद्रबिंंदू मानून कारभार केला. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देताना भविष्याचा वेध घेऊन साखर उत्पादनाशिवाय सभासद हिताचे अनेक उपक्रमपूरक उद्योग उभे केले. राज्यात किसन वीर कारखाना नावारूपाला आणला.
दरम्यान, या बैठकीस कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक मदन भोसले, गजानन बाबर, संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रवीण जगताप, प्रताप यादव, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, भगवानराव आवडे, विजया साबळे, आशा फाळके उपस्थित होते. (वार्ताहर)
नव्या कारभाराचा वृक्षारोपणाने प्रारंभ...
नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर व संचालक मंडळाने शेततळ्यांच्या परिसरात उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून नव्या कारभाराचा प्रारंभ केला. कारखान्याच्या आजपर्यंतच्या विकासात वृक्षलागवडीतून खडकाळ माळरानाचे नंदनवन करताना मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले आहे. २१ जानेवारी २००३ रोजी बदामबनापासून वृक्षलागवडीला सुरुवात होऊन बारा वर्षांत सुमारे २५ हजार फळ-फुले, झाडे लावून कारखाना परिसर हिरवागार केलेला आहे.
सभासदाभिमुख कारभार
सभासदांनी तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचा योग्य वापर करून सहकारी संचालकांच्या सहकार्य व परस्पर सुसंवादातून यशवंतराव चव्हाण व कारखान्याचे संस्थापक आबासाहेब वीर यांना अभिप्रेत असलेला सभासदाभिमुख कारभार करण्याबरोबरच गतिमान विकासाची प्रक्रिया अखंडपणे सुरू ठेवली जाईल.