नगराध्यक्षपदासाठी दिसणार फलटणमध्ये नवा चेहरा

By admin | Published: October 7, 2016 09:52 PM2016-10-07T21:52:10+5:302016-10-08T00:00:46+5:30

अनेकांचा हिरमोड : महिलेसाठी आरक्षित झाल्याने नवा चेहरा किंवा विद्यमानांना संधी

A new face in Phaltan will be seen for the post of city president | नगराध्यक्षपदासाठी दिसणार फलटणमध्ये नवा चेहरा

नगराध्यक्षपदासाठी दिसणार फलटणमध्ये नवा चेहरा

Next

नसीर शिकलगार-- फलटण : फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने या पदावर नवीन चेहरा पाहण्यास मिळतो की सत्ताधारी राष्ट्रवादी विद्यमान नगराध्यक्षांना पुन्हा संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे. खुल्या प्रवर्गाला संधी न मिळाल्याने अनेक मोठ मोठ्या नेते मंडळींचा हिरमोड झाला आहे.
फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत मुंबई येथे मंत्रालयात करण्यात आली. आरक्षण सोडतीमुळे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. तर आरक्षण काय पडते यासाठी पैजाही लागल्या होत्या. काय आरक्षण पडेल याची सारखी विचारपूस होत होती. खुल्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जातीसाठीच्या पुरुष प्रवर्गातून अनेक दिग्गज इच्छुक होते. मोठी नावे चर्चेत होती. मात्र, नागरिक मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचे स्वप्न भंग पावले गेले आहे. नगराध्यक्षपद पाच वर्षांसाठी आरक्षित असल्याने आता सर्वच पक्षांना उमेदवार उच्चशिक्षित, स्वत: निर्णय घेणारा द्यावा लागणार आहे. तरुण मतदारांची संख्या वाढल्याने त्यांचा कल उच्चशिक्षित उमेदवारांकडेच असणार असल्याने त्याचा विचार सर्वच पक्षांना करावा लागणार आहे.
फलटण नगरपालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची सत्ता असल्याने यावेळेस ते कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे. विद्यमान नगराध्यक्षा सारिका जाधव या ओबीसी प्रवर्गात मोडतात. सध्या त्या खुल्या गटातून नगराध्यक्षपदावर असल्याने त्यांना पुन्हा रामराजे संधी देतात की अन्य कोणाला देतात याकडे नजरा लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे हे नागरिक मागास प्रवर्गातून प्रबळ दावेदार होते. मात्र, महिलांसाठी राखीव पडल्याने त्यांच्या पत्नी नीता नेवसे यांचेही नाव पुढे आले आहे.
शहरात ओबीसी समाजाची त्यातल्या त्यात माळी समाजाची संख्या जास्त असल्याने या समाजाला प्रतिनिधीत्व कोण देतंय यावरही बरेचसे गणित अवलंबून असणार आहे. विरोधी राष्ट्रीय काँग्रेसलाही आता प्रबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. भाजपा, शिवसेना स्वतंत्र की संयुक्त लढते यावरूनच त्यांचा उमेदवार ठरणार आहे. उमदेवार निवडताना सर्वच पक्षांना मोठा कथ्याकूट करावा लागणार आहे. शिवाय नवीन चेहरे समोर आले तर त्यांना प्रभावीपणे लोकांपुढे आणावे लागणार आहे.


खुल्या प्रवर्गातील इच्छुक नेते नगरसेवकच!
नगराध्यक्षपद खुले पडल्यास इच्छुकांची मोठी रांग सर्वच पक्षांकडे होती. मात्र, त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झाल्याने आता खुल्या प्रवर्गातील इच्छुक नेते मंडळींना नगरसेवक पदात रस घ्यावा लागणार आहे. त्यामुळे इतके दिवस नगरसेवक पदाचे आरक्षण पडून थंड असलेले सर्वजण आता कंबर कसून कामाला लागण्याची शक्यता आहे.

Web Title: A new face in Phaltan will be seen for the post of city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.