Satara News: भूस्खलनामुळे बाधित ६१४ कुटुंबांंना लवकरच नवीन घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:40 AM2023-06-17T11:40:39+5:302023-06-17T11:41:14+5:30
बहुतांशी ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केला
सातारा : महापूर आणि भूस्खलनात बाधित झालेल्या नऊ गावातील ६१४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, या घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन १० सप्टेंंबरला होईल. तसेच वन विभागाच्या हद्दीजवळील ३० ते ४० गावांतील वन जमिनींना सौर कुंपण व चर खोदण्याच्या कामांचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा लोकल बोर्ड इमारतीचे प्रस्तावित नूतनीकरण, भूस्खलनग्रस्त गावांचे पुनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेणे व एमएमआरडीएकडून घराचे मॉडेल तयार करणे, वन जमिनींना सौर कुंपण प्रस्ताव शासनास पाठविणे, आदी विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी म्हणाले, भूस्खलन, पुरामुळे बाधित झालेल्या नऊ गावांतील ६१४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी बहुतांशी ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केला आहे. जलसंपदा विभागाची जागा वर्ग करण्याचा प्रस्ताव असून, तो प्रश्न महिनाभरात सुटेल. पंधरा दिवसांत या घरांच्या बांधकामाचे टेंडर निघणार असून, १० सप्टेंबरला घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात गावातील जी घरे अजूनही धोकादायक आहे त्यांचा सर्व्हे करण्यात येईल.
याशिवाय वनविभागाच्या हद्दीतील ३० ते ४० गावांतील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडून उपद्रव होत असून, पिकांचे नुकसान होत आहे. त्यासाठी त्या परिसराला सौर कुंपण घालण्याचा प्रस्ताव आहे. शक्य तेथे सौर कुंपण आणि शक्य तेथे चर काढावे, असा प्रस्ताव दिला आहे.
शिवाय जिल्हा परिषदेमधील जुन्या लोकल बोर्डाची इमारतीची डागडुजी करून पूर्वी जशी इमारत होती तशीच जुन्या इमारतीचे सौंदर्य व्यवस्थित जतन करण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकल बोर्डाचे पहिले ते शेवटचे अध्यक्ष यांचे छायाचित्रे व कार्यकाल, इतिहास या इमारतीमध्ये लावावे, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.