लग्न सोहळे मांडवाऐवजी रंगताहेत पोलीस ठाण्यात, उत्साहाच्या भरात घडतंय भलतंच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 04:17 PM2022-06-08T16:17:32+5:302022-06-08T16:18:34+5:30
बूट पळविण्यावरुन हाणामारी, वधूला उचलून घेताना चुकीचा स्पर्श अशा घटनामुळे होतायत वाद
दत्ता यादव
सातारा : लग्न समारंभ म्हटला की नानाविध प्रकारचे लोक आणि त्यांचे मन राखण्यासाठी महिनोन महिने तयारी केली जाते. मात्र, ऐन लग्न सोहळ्यात या तयारीवर अलीकडे पाणी पडत आहे. लग्नातील नवनवीन रुढी, परंपरा वादाचे कारण ठरू लागल्या असून, या लग्नसोहळ्यांचा बॅण्ड मांडवात वाजण्याऐवजी आता चक्क पोलीस ठाण्यात घुमू लागलाय.
अलीकडे लग्न सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या रूढी, परंपरा सुरू झाल्या आहेत. या रुढीतून लग्नसोहळ्याला रंगत येत असली तरी यातून नातं तुटण्याचेही प्रकार सर्रास घडू लागलेत. त्यामुळे या रुढी कितपत जपल्या जाव्यात, हाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय. आनंदात सुरू असणारा लग्न सोहळा क्षणात विस्फोटक बनतोय. एवढेच नव्हे तर नातं जोडायला आलेले पै पाहुणे एकमेकांचे वैरी होताहेत. हे असं का घडतंय, याचीही विचारणा होणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून लग्न सोहळ्याला गालबोट लागण्याचे प्रकार घडत आहेत. अशा काही मोजक्या घटना आपण पाहू या.
सातारा तालुक्यातील एका मंगल कार्यालयामध्ये इंजिनिअर असलेल्या एका युवतीचा लग्नसोहळा होता. हा सोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडत होता. पण जेव्हा वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात हार घालत होते तेव्हा वधूला काही उत्साही युवकांनी उचलून घेतलं. पण इथं भलतंच घडलं. ज्या युवकांनी वधूला उचलून घेतलं होतं त्यापैकी एकाने वधूला चुकीचा स्पर्श केला. हा प्रकार वधूच्या लक्षात आल्यानंतर तिने युवकांना हाताने बाजूला झटकलं आणि घडलेला प्रकार इतरांना सांगितला.
बूट पळविण्यावरुन हाणामारी
पाटण तालुक्यात लग्न सोहळा पार पडल्यानंतर नवरदेवाचे बूट दोन मुलींनी लपवून ठेवले. बूट परत देण्यासाठी मुलींनी दहा हजारांची मागणी केली. पण बूट होते केवळ दीड हजारांचे. वरपित्याला हे समजल्यावर त्यांनी जवळच दुकानात जाऊन दुसरे शूज आणले. याचा राग मुलींना आला. त्यांनी ते शूज तेथे असलेल्या गटारात टाकले. इथेच वादाला तोंड फुटलं. शाब्दीक चकमकीनंतर हमरीतुमरी होऊन दोन्ही वऱ्हाडी मंडळी. एकमेकांना भिडली. तुंबळ हाणामारी झाली.
लग्न सोहळ्यात चित्रपटातील अनुकरण केले जात आहे. हे पहिल्यांदा थांबविले पाहिजे. अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केले पाहिजेत. तरच लग्न सोहळ्यातील वादावादीचे प्रकार थांबतील. - जितेंद्र वाडेकर, सामाजिक कार्यकर्ता, सातारा
उत्साहाच्या भरात वहऱ्हाडी मंडळीकडून काहीही घडतंय. याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. काय करावे आणि काय करू नये, अशा प्रकारच्या सूचनांची पाटी लग्न सोहळा ठिकाणच्या बाहेर लावणे हिताचे आहे. - विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका