‘झेडपी’त पुन्हा ‘नवा गडी.. नवे राज्य’ !
By admin | Published: October 13, 2015 10:06 PM2015-10-13T22:06:16+5:302015-10-14T00:01:17+5:30
नव्यांना मिळणार संधी : अजित पवारांच्या सूचनेमुळे पदाधिकाऱ्यांची गोची
सातारा : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फलटण येथे झालेल्या बैठकीत सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऐन ग्रामपंचायत निवडणुकांच्या कालावधीत हे राजीनामे द्यावे लागणार असल्याने या पदाधिकाऱ्यांची गोची झाली आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे बहुमत आहे. केंद्रात व राज्यातील सत्ता गमावल्याने राष्ट्रवादी विशेष सतर्क झाली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जिल्हा परिषद सदस्यांची मरगळ दूर करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मुदत २० डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे त्यांचे राजीनामे घेऊन नव्याने जिल्हा परिषद सदस्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेचे आव्हान पुढे दिसत असल्याने बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘पॅचअप’ मोहीम सुरु असल्याचे यातून स्पष्ट होऊ लागले आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी बदलाबाबत राष्ट्रवादीमधील काही सदस्यांनी सह्यांची मोहिम राबविली होती. याचे निवेदन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अजित पवारांना दिले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी फलटण येथे झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. नेत्यांच्या सूचनेमुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी, समाजकल्याण सभापतींना राजीनामा द्यावा लागणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी राजीनामे घेऊ नयेत, असा युक्तिवाद उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी केला होता. मात्र, अजित पवारांनी त्याला साफ नकार दिला आहे. साहजिकच खासदार उदयनराजे भोसले यांच्यात आणि अजित पवार यांच्यातील मतभेदाच्या राजकारणामुळे त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतल्याची उलट-सुलट चर्चा आहे. (प्रतिनिधी)
नरळे, शिंदे, शेळके की माळवे ?
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. मानसिंगराव माळवे, सुभाष नरळे, शिवाजीराव शिंदे, आनंदराव शेळके-पाटील यांच्या नावाची सध्या अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. याव्यतिरिक्त एखाद्या महिला जिल्हा परिषद सदस्यालादेखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
अमित कदम उपाध्यक्ष
सव्वा वर्षापूर्वी उपाध्यक्ष निवडताना अमित कदम यांना डावलण्यात आले होते. अखेरच्या टप्प्यात त्यांना उपाध्यक्षपदावर संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रवादी लाभ उठवू शकते.