महिला सुरक्षिततेबाबत नवीन कार्यपद्धती अंमलात आणाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:29+5:302021-07-10T04:27:29+5:30
सातारा : राज्य शासनाचे महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य असून, त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांपर्यंत ...
सातारा : राज्य शासनाचे महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य असून, त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवावी, यासाठी महिला लोकप्रतिनिधी, बचत गट व सामाजिक संस्थांची मदत घेऊन सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षिततेबाबत नवीन कार्यपद्धती अंमलात आणावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनेबाबत सातारा पोलीस दलाने एक कार्यप्रणाली तयार केली आहे. याचा आढावा गृह राज्यमंत्री देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला. या आढावा बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे आदी उपस्थित होते.
पोलीस विभागातील ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ज्युडो कराटे येतायत, अशा कर्मचाऱ्यांकडून शाळा, महाविद्यालयातील मुलींना स्वत:ची सुरक्षा कशी करता येईल, यासाठी प्रशिक्षण द्यावे. शाळा व महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरू आहेत. प्रत्येक शाळेला व महाविद्यालयांना भेटी देऊन पोक्सो कायद्यांची माहिती द्यावी. तयार करण्यात आलेल्या कार्यप्रणालीनुसार महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे तात्काळ दाखल करून विविध योजनांतर्गत त्यांना आर्थिक मोबदला द्या, अशा सूचनाही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी केल्या.
फोटो नेम : ०९डीआयओ
फोटो ओळ : सातारा येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत मंत्री शंभूराज देसाई यांना अधिकाऱ्यांनी माहिती दिली.