राज्यात नवीन रोपटे लावले, कसं वाढवायचं हे इतरांनी सांगायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
By दीपक शिंदे | Published: November 1, 2022 07:19 PM2022-11-01T19:19:28+5:302022-11-01T19:22:54+5:30
ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही
सातारा/बामणोली : कोयनेच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मी वाढलोय. पहिल्यापासून गावाची ओढ आहे. कुठे काय उगवते आणि लावलेले रोपटं कसं वाढवायचं, हे मला चांगले माहिती आहे. त्यामुळे राज्यात जे नवीन रोपटे लावले आहे, ते अत्यंत उत्तम प्रकारे जोपासले जाईल आणि त्याची वाढही होईल. त्यामुळे ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही, असा टोला मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे खुर्द या गावी आले होते. त्यांनी मंगळवारचा पूर्ण दिवस शेती कामासाठी दिला. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यांना शेतीबाबत प्रचंड आवड आहे. दरवर्षी भात लावणीसाठी पावसाळ्यात आणि काढणीसाठी दिवाळीच्या काळात ते येत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पावसाळ्यात त्यांना फारसा वेळ देता आला नाही. मात्र, आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत त्यांनी मंगळवारचा संपूर्ण दिवस शेती कामासाठी दिला. त्याबरोबरच फळबागेतही फेरफटका मारत झाडांची पाहणी केली. त्यांनी स्वत: आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. पुढील तीन महिन्यांमध्ये या स्ट्रॉबेरीला फळे येणार आहेत. तर पावसाळ्याच्या दरम्यान लावलेल्या स्ट्रॉबेरीला सध्या लाल चिटूक स्ट्रॉबेरीही लागलेली दिसली.
ते म्हणाले, आपण जेव्हा शेती करतो तेव्हाच इतरांना सांगू शकतो. त्यामुळे या भागात मी विविध प्रकारची शेती केली आहे. शेतात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. शेतात अत्याधुनिक यंत्राचा वापर केला आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. स्ट्रॉबेरी, सफरचंद, ड्रॅगन फ्रूट अशी वेगवेगळी फळशेती शेतकऱ्यांनी केली पाहिजे. पर्यायी पिके घेतली तर अडचणी कमी येतील. राज्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते. अशावेळी त्यातून सावरून कसे नियोजन करावे, यासाठी हे प्रयोग शेतात केले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांची पारंपरिक शेती खूप कमी होती. काही वर्षांत त्यांनी याठिकाणी शेती विकत घेतली आहे. त्या शेतात त्यांनी गोशाळाही बांधली आहे. यामध्ये गावठी गायींचे पालन केले जाते. त्याबरोबरच शेतीसाठी पाण्याकरिता शेततळे बांधण्यात आले असून, या शेततळ्यात मत्स्यपालनही केले जाते. अशा प्रकारे त्यांनी एकाच ठिकाणी विविध प्रयोग करून राज्यातील शेतकऱ्यांसाठीही वेगळा संदेश दिला आहे.
या शेतीत मी खूप रमतो...
गावाबद्दल प्रचंड ओढ आहेच; पण या ठिकाणचा निसर्ग एकनाथ शिंदे यांना नेहमी खुणावत असतो. या ठिकाणचा हिरवागार परिसर मनाला आनंद देतो. समोर निळेशार पाणी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि या परिसरात मोबाइलचा संपर्क होत नाही. त्यामुळे सर्व कोलाहलापासून दूर निवांत राहता येत असल्याने याठिकाणी अधिक रमतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.