सातारचे नूतन पोलिस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे, वैशाली कडूकर अपर पोलिस अधीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:26 AM2024-08-14T11:26:54+5:302024-08-14T11:27:27+5:30
पोलिस अधीक्षक समीर शेख यांची कामगिरी लक्षवेधी ठरली
सातारा : जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलिस अधीक्षक ऑचल दलाल या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाली असून, डाॅ. सुधाकर पठारे साताऱ्याचे नूतन पोलिस अधीक्षक, तर वैशाली कडूकर साताऱ्याच्या नवीन अपर पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. एकाच वेळी दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहरचे उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. डाॅ. सुधाकर पठारे हे ठाणे शहरचे पोलिस उपआयुक्त म्हणून काम करत होते. त्यांची साताऱ्याचे नूतन पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. ते बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत. अपर पोलिस अधीक्षक ऑचल दलाल यांची समादेशक राज्य राखीव पोलिस बल पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथून आलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांची नियुक्ती झाली आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षांपूर्वी सातारा जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारला होता. त्यांची साताऱ्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. प्रतापगडावरील अफझलखान कबरीजवळ असलेले अतिक्रमण कोणताही अनुचित प्रकार न घडता काढले. तसेच जिल्ह्यात जातीय दंगलही घडली. ही दंगल नियंत्रणात आणून दंगलखोरांवर त्यांनी कारवाई केली. तसेच अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रमही राबविले.
बुके नको, बुक द्या, असा उपक्रमही त्यांनी राबविला. जवळपास हजार पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील मुलांना दान केली. उंच भरारी योजनेद्वारे गुन्हेगारी क्षेत्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला त्यांनी काम मिळवून दिले. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावोगावी नागरिकांना सतर्क करून अनेक अप्रिय घटना रोखण्यात त्यांना यश आले.