खंबाटकी घाटात सुसज्ज नवीन बोगद्याचा थाट, वाहतूक होणार सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:16 PM2022-01-31T14:16:03+5:302022-01-31T14:42:20+5:30
खंबाटकी घाट हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
खंडाळा : सातारा-पुणे आशियाई महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित होण्यासाठी नवीन खंबाटकी बोगद्याच्या सहापदरीकरण मार्गिकेच्या अंतिम खुदाईद्वारे खुलेकरण करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या हा मेगा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन खंबाटकी घाटात नवीन बोगद्याचा थाट पहायला मिळणार आहे.
नवीन बोगद्याच्या अंतिम खोदकामाचे खुलेकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे झाले. या महामार्गावरील खंडाळ्याच्या नजीक असलेल्या हरेश्वर डोंगररांगात असणारा खंबाटकी घाट हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मात्र, आधुनिक युगात देशातील दळणवळण हे गतिमान झाले आहे. त्यामुळे खंबाटकी घाटातील प्रवास अधिक गतीने आणि सुरक्षित होण्यासाठी नवीन बोगद्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
खंबाटकी घाटाचे आठ किलोमीटर अंतर चढून जाण्यास सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी जातो. तर पुण्याकडे जाताना सध्या एक बोगदा अस्तित्वात आहे. तेथून एकेरीच वाहतूक होते. त्यासाठी साधारण १५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यातच प्रतिदिन २२ हजार असणाऱ्या वाहनांची संख्या आता ५५ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होत असल्याने नवीन बोगदा मंजूर करण्यात आला आहे.
खंबाटकीच्या नवीन बोगद्यासाठी वेळेपासून वाण्याचीवाडी ते खंडाळा असा सुमारे ६.३ किलोमीटरचा नवीन सहापदरी रस्ता बनविला जात आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचे काम करण्यात येत आहे. दोन्ही बोगद्यांचे ११४८ मीटर खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. १६.१६ मीटर रुंद व सुमारे ९.३१ मीटर उंच असणाऱ्या या बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन लेनचे रस्ते तयार करण्यात येत असून, येथून दुहेरी वाहतूक होणार आहे. बोगद्यातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी रस्ताही ठेवला जाणार आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे. तसेच बोगदा आणि नवीन रस्त्यावर आपत्कालीन क्रॉस रोड बनविला जाणार आहे. त्याचा उपयोग अपघातप्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.
इंधन बचत ....
खंबाटकी घाटातून प्रवास करताना वाहनांना इंधन मोठ्या प्रमाणात लागते. शिवाय वाहन दुरुस्ती खर्चही वाढतो. मात्र, या नवीन बोगद्यामुळे वाहनांचा वार्षिक सुमारे १४ कोटी ६३ लाख रुपये इंधन खर्च वाचणार आहे आणि वाहनांवरील खर्चही कमी होणार आहे.
कर्दनकाळ वळण निघणार ...
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणाचा धोका काढण्यासाठी सुधारित रस्त्याचे काम सुरू आहे. शेकडो प्रवाशांचा बळी घेणारे हे वळण निघणार असल्यामुळे बोगदा पूर्ण झाल्यावर येथून दुहेरी वाहतूक सुरू होईल. शिवाय रस्ता सरळ झाल्याने अपघातांची मालिका खंडित होईल.