गणेवाडीच्या प्रियंकाला मिळणार नवी दृष्टी... गुड न्यूज-शिक्षकाची माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:08 AM2018-04-17T00:08:09+5:302018-04-17T00:08:09+5:30
मल्हारपेठ : गणेवाडी-ठोमसे, ता. पाटण येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक अमोल हजारे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या प्रियंकाला नवीन दृष्टी
सुनील साळुंखे ।
मल्हारपेठ : गणेवाडी-ठोमसे, ता. पाटण येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक अमोल हजारे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या प्रियंकाला नवीन दृष्टी मिळणार आहे.
सामाजिक कार्याची आवड असणाºया गणेवाडी शाळेचे उपशिक्षक अमोल हजारे यांनी मानव विकास संस्था, युवा मोरया सामाजिक संस्था, संजीवन सामाजिक संस्था, बुद्र्राणी हॉस्पिटल व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ठोमसे ग्रामपंचायतीत मोफत नेत्रदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात ठोमसे, मोरेवाडी, तांबेवाडी, गणेवाडीतील संपूर्ण विद्यार्थ्यांसह दोनशे ग्रामस्थांनी मोफत नेत्र तपासणी केली तर ७० ग्रामस्थांनी चष्म्याचा लाभ घेतला.
यावेळी पहिल्या इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी प्रियंका विठ्ठल माने हिच्या डोळ्यातून जन्मापासून पाणी येत असल्यामुळे तिची नजर कमी कमी होत असल्याचे तपासणी करताना लक्षात आले. यावेळी बुद्र्राणी हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले की, प्रियंकाचे आॅपरेशन केले तरच तिचे डोळे वाचू शकतात, अन्यथा तिला कायमचे अंधत्व येऊ शकते. यावेळी मानव विकास संस्था, सातारा येथील युवा मोरया सामाजिक संस्थेने प्रियंकाला डोळ्याच्या आॅपरेशनच्या संपूर्ण खर्चाची तयारी दर्शविली आहे.
प्रियंकाचे वडील विठ्ठल माने हे दुकानात हमाली करत असून, आई संगीता ही मोलमजुरी करून कुटुंब चालवत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने जन्मापासून मुलीच्या डोळ्यातून पाणी येत असूनही कुटुंबीय तिच्यावर उपचार करू शकले नाहीत. मात्र देवदुताप्रमाणे उपशिक्षक हजारे यांनी मोफत नेत्रतापसणी शिबिर घेऊन प्रियंकाला नवीन दृष्टी दिल्यामुळे ठोमसे, उरूल भागातील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. प्रियंका पहिलीत शिकत असून, हुशार व चाणाक्ष आहे.
उपचारासाठी मदतीचे आवाहन
प्रियंकाची आई संगीता व चार वर्षांचा लहान भाऊ ओंकार यांच्या डोळ्यातूनही पाणी येत आहे. हा अनुवांशिक आजार असून, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्या तरी दानशूर व्यक्तींनी समोर येऊन प्रियंकाची आई व लहान भाऊ ओंकार यांच्या डोळ्यावर उपचार करून नवीन दृष्टी देण्याची मागणी ठोमसे ग्रामस्थांच्यातून होत आहे.
प्रियंकासारख्या गरजू व गरीब कुटुंबांतील लोकांना मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ होऊन डोळ्यांच्या व्याधीपासून मुक्ती व्हावी, हा आपला उद्देश आहे. उरूल, मल्हारपेठ परिसरातील अशा प्रियंकांचा शोध घेण्यासाठी विविध वाडी वस्तीवर शिबिरे घेऊन लोकांची सेवा करणार आहे.
- अमोल हजारे, उपशिक्षक,
गणेवाडी जिल्हा परिषद शाळा