लोकमान्यतेसाठी वारसदारांसह नवखेही सज्ज

By admin | Published: November 9, 2016 01:12 AM2016-11-09T01:12:48+5:302016-11-09T01:12:48+5:30

जुन्या नव्यांचा मेळ : काँग्रेसची प्रत्येक ठिकाणी तर शिवसेनेची मोजक्याच जागी कडवी झुंज; राजकीय वारसा आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

Newcomer ready for legacy | लोकमान्यतेसाठी वारसदारांसह नवखेही सज्ज

लोकमान्यतेसाठी वारसदारांसह नवखेही सज्ज

Next

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीसाठी प्रमुख पक्ष पूर्ण क्षमतेने मैदानात उतरले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांसमोर कडवे आव्हान निर्माण करण्यासाठी उमेदवार निश्चितीपासूनच फासे टाकले आहेत. राजकीय वारसा आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसह नवख्यांनाही संधी दिली गेली. जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला असला तरी वारसांना की नवख्यांना लोकमान्यता मिळणार, याचेच आडाखे बांधले जात आहेत.
नगरपंचायतीच्या पहिल्या सामन्यात दोन्ही काँग्रेसने प्रत्येक जागेवर आपले खेळाडू दमदारपणे उतरविले आहेत तर भाजपाने आणि शिवसेनेने मोजक्याच जागी कडवी झुंज देण्यासाठी कंबर कसली आहे. प्रभागांची रचना आणि मतदारांचा कल घेऊन प्रत्येक पक्षाने योग्य उमेदवार देण्यावर भर दिला. त्यामुळेच जुन्या आणि नवख्यांना संधी निर्माण झाली. पहिलाच सामना चुरशीचा रंगणार, हे निश्चित झाले आहे.
प्रभाग एकमधून अनुभवी असलेल्या माजी सदस्य राष्ट्रवादीचे दयानंद खंडागळे यांचा सामना काँग्रेसचे सचिन खंडागळे हे प्रथमच करणार आहेत. प्रभाग चारमधून सदस्या असलेल्या राष्ट्रवादीच्या शारदा खंडागळेंशी नवख्या कल्पना गाढवे यांची लढत आहे.
प्रभागत सातमध्ये काँग्रेसमध्ये हुकमी भूमिका बजावणाऱ्या जाधव परिवारातील जयश्री जाधवांशी राष्ट्रवादीच्या नवख्या नंदा गायकवाड लढत देतील. प्रभाग आठमधून माजी सभापती लताताई नरूटे यांचा सामना काँग्रेसच्या हेमलता ठोंबरे करणार आहेत.
प्रभाग नऊमधून राष्ट्रवादीचे लक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी सदस्य अशोक गाढवे यांचा सामना नवख्या दत्तात्रय गाढवे यांना करावा लागणार आहे.
सेनेचे गोविंद गाढवे सुद्धा पहिल्यांदा नशीब आजमावणार आहेत. प्रभाग दहामध्ये माजी सरपंच काँग्रेसचे प्रल्हाद खंडागळे यांच्याशी राष्ट्रवादीचे बाळासाहेब गाढवे लढत देत असून, भाजपाचे अभिजित खंडागळे व सेनेचे मंगेश खंडागळेसुद्धा लोकांचा कल घेणार आहेत.
प्रभाग ११ मधून माजी सदस्य राहुल गायकवाड यांचा सामना राष्ट्रवादीचे विद्याधर गायकवाड करणार आहेत.
प्रभाग बारामधून राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच जावेद पठाण यांचा सामना काँग्रेसच्या साजिद मुल्ला यांना करावा लागेल. प्रभाग चौदामधून विद्यमान पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्याशी राष्ट्रवादीचे नवखे शैलेश गाढवे टक्कर देणार आहेत. तर प्रभाग सतरामधून माजी सदस्य काँग्रेसचे संतोष बावकर यांच्याशी राष्ट्रवादीचे शरद दोशी लढत देणार आहेत.
या तुल्यबळ लढतीमध्ये जनता काय भूमिका घेणार, हे काळच ठरविणार आहे. (प्रतिनिधी)
कोणी कासवाच्या तर कोणी सशाच्या गतीने...
या निवडणुकीमध्ये पक्षीय धोरणाबरोबरच उमेदवारांचे वैयक्तिक मेरीट मतदारांकडून तपासले जाणार आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसने एकमेकांसमोर उमेदवारी देताना सापसिडीचा खेळ आखला आहे. त्यामुळे ऐन प्रचारात कोणाचा पाय कोणाच्या पायात अडकणार, यावरच यशाची गणिते मांडता येणार आहेत. त्यातच भाजपा-शिवसेनेच्या सोंगट्या किती घरांमधून उड्या मारणार, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. शेवटी राजकारणामध्ये कोणीच कोणाला कमी लेखू नये. कारण कुणीही कितीही जोमाने राजकीय शिडी चढला आणि एखादी सोंगटी चुकीची पडली तरी त्याला परतीचा प्रवास ठरलेला आहे; पण सत्तासंघर्षाच्या वाटेवर आपण शर्यतीत आहोत, याची जाणीव प्रत्येकाला असल्याने कोणी कासवाच्या तर कोणी सशाच्या गतीने धावतो आहे. मात्र, शर्यत तोच जिंकणार आहे, जो मतदारांचे मन जिंकणार आहे.
 

Web Title: Newcomer ready for legacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.