‘कास’च्या पुढच्या फुलांचा हंगाम पावसावर अवलंबून
By admin | Published: September 29, 2015 10:02 PM2015-09-29T22:02:06+5:302015-09-30T00:05:11+5:30
तेरड्याचा बहर ओसरला : लाखो रुपयांचे शुल्क वसूल
पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास पुष्प पठारावरील विविधरंगी फुलांचे गालिचे जिल्ह्यांसह इतर राज्यातील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या पुष्पपठाराला आतापर्यंत ८५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे शुल्क वसूल झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने रस्त्यालगत असणारी तेरड्याचे गालिचे कमी होत असून पठारावरील रानमार्गालगत काही ठिकाणी तेरडा दिसत आहे. मिकीमाऊस, सेरोपेनिया नयनी, कंदील पुष्प, टोपली, कार्व्ही, निसुरडी, मंजिरी चांगली फुललेली दिसून येत आहे. पावसाने आठवडाभर ओढ दिल्याने पाऊस पडला नाही तर फुलांचा हंगाम आठवडाभर चालेल. परंतु वरुणराजाने हजेरी लावली तर हंगाम महिनाभर राहू शकतो, अशी माहिती कासानी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अशोक कुरळे यांनी दिली.
तसेच आज शेकडो पर्यटकांनी कुमुदिनीकडे आपली पावले वळविली. दरम्यान, याठिकाणी शैक्षणिक सहलींचेही प्रमाण वाढले होते. कुमुदिनी कमळे पावसात दुपारी तीनपर्यंत फुललेली दिसून येत होती. परंतु सकाळी बाहर व दुपारी लवकर कमळाच्या पाकळ्या मिटू लागत आहेत. या संपूर्ण हंगामात पहिल्यांदाच कुमुदिनीकडे चार एसटी बस धावू लागल्या होत्या. ही कमळे आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत दिसत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
पठारापासून तीन किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्यावरुन पायी प्रवास करत कुमुदिनी तलावाकडे जाताना बऱ्याच वृद्ध पर्यटकांची दमछाक होते. येथे येण्यासाठी वाहनांची सोय होणे गरजेचे आहे.
-शशिकला कुलकर्णी,
पर्यटक, पुणे