पुढील दोन दिवसांत वीस चारा छावण्या - : विजय शिवतारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:34 AM2019-05-18T00:34:55+5:302019-05-18T00:35:33+5:30
‘माणमध्ये एक्कावन्नपैकी एकतीस चारा छावण्या सुरू आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या दोन दिवसांत सुरू करणार आहे. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा.
दहिवडी : ‘माणमध्ये एक्कावन्नपैकी एकतीस चारा छावण्या सुरू आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या दोन दिवसांत सुरू करणार आहे. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा. कॅमेरे लावणे महत्त्वाचे नसून जनावरे वाचविणे महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
पिंगळी बुद्र्रुक येथे माणदेशी मागासवर्गीय सूतगिरणीने सुरू केलेल्या चारा छावणीला पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी चारा छावणीची पाहणी करून पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शुगर ग्रीडचे चेअरमन, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, ‘रासप’चे जिल्हाध्यक्ष मामू वीरकर, भाजपचे रणधीर जाधव, शिवसेनेचे अनिल सुभेदार, रासपचे बबन वीरकर, केशवराव वणवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, तहसीलदार बाई माने, गट विकास अधिकारी गोरख शेलार, गटविकास अधिकारी काळे उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, ‘जनावरांना प्रथम प्राधान्य द्या. इतर गोष्टींना दुय्यम. छावणी सुरू करणे शासनाची जबाबदारी आहे. जाचक अटी न ठेवता लवकर छावण्या कशा सुरू करता येतील, ते पाहावे. चार दिवसांत चारा छावणी सुरू करणार नाहीत, त्या चालकांची परवानगी काढून घेऊ. जे सध्या चारा छावणी चालवत आहेत, त्यांना ती चारा छावणी चालविण्यास परवानगी द्या. छावणी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनुदान देण्यात येईल.
जनावरांचा खर्च छावणी चालकांवर येणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. पाणी भरणा केंद्रावरून छावणीतील जनावरांसाठी लागणारे पाणी देण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर छावणी सुरू करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी उशीर केल्यास नोटीस काढण्यात येईल. जिल्हा बँक, मोठ्या पतसंस्था, साखर कारखाने यांना छावणी चालवण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.’
अनिल सुभेदार, डॉ. संतोष गोडसे, पृथ्वीराज गोडसे, धर्मराज जगदाळे, राजुभाई मुलाणी, पांडुरंग खाडे, गोविंदराव शिंदे, धनाजी निंबाळकर, शिवाजी दबडे, तुषार ओंबासे उपस्थित होते.
शासनाने छावणी चालून दाखवावी
यावेळी रासपचे मामुशेठ वीरकर यांनी जनावरांची चारा छावणी चालवण्यासाठी एका जनावराला रोज किमान ११९ रुपये खर्च येतो. त्यामुळे मिळणारे अनुदान कमी असून, १२० रुपये करावे किंवा शासनाने ९० रुपये प्रती जनावरांप्रमाणे अनुदानात छावणी चालवून दाखवावी, असे निदर्शनास आणून दिले.