मान्सूनपूर्व पावसाने निगडी, वेलंगला तासभर झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:25 PM2019-06-02T23:25:53+5:302019-06-02T23:25:58+5:30
रहिमतपूर : मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी कोरेगाव तालुक्यातील रंगनाथ स्वामींची निगडी व वेलंग या दोन गावांना झोडपून काढले. वादळी ...
रहिमतपूर : मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी कोरेगाव तालुक्यातील रंगनाथ स्वामींची निगडी व वेलंग या दोन गावांना झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने रहिमतपूर-कोरेगाव रस्त्यावरील वाहतूक मंदावली
होती.
कोरेगाव तालुक्यात रविवारी सकाळपासूनच कमालीचा उष्मा जाणवत होता. सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केली. सोसाट्याच्या वाºयाबरोबरच विजांचा कडकडाट सुरू होऊन जोरदार पावसास सुरुवात झाली. तालुक्यातील रंगनाथ स्वामींची निगडी व वेलंग परिसरात सुमारे एक तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेतात पाणीच पाणी साचले होते. कोरडे पडलेले ओढे व नाले या पावसामुळे काही वेळातच तुडुंब भरून वाहू लागले. वाºयाचा वेग प्रचंड असल्यामुळे रहिमतपूर-कोरेगाव रस्त्यावरील अनेक झाडे व फांद्या तुटून पडल्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहनधारकांनी पाऊस थांबल्यानंतर स्वत:च रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेल्या फांद्या बाजूला करून आपल्या वाहनांना रस्ता केला. दरम्यान, काही ठिकाणी रस्त्यावरच बाभळीच्या फांद्या अर्धवट तुटून लोंबकळत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ मंदावली होती. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी या पावसामुळे सुखावला.
ढेकळं फुटली सºया भरल्या
यंदा उन्हाळी पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतात नांगरलेली ढेकळं तशीच होती. पाण्याअभावी ऊसही करपून गेला होता. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेले होते. अशावेळी झालेल्या पावसामुळे ढेकळे फुटून विरघळून गेली, तर उसाच्या सºया तुडुंब भरून वाहिल्या.