पालिकेच्या ‘घरकुलां’त रात्रीस खेळ चाले ! आॅन दि स्पॉट रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:16 PM2020-02-11T23:16:45+5:302020-02-11T23:19:57+5:30
काही विघ्नसंतोषींकडून इमारतीची मोडमोडही करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या घरकुलांमध्ये पत्त्यांचे डाव रंगत आहेत. मद्यपींसाठी ही घरे म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती बनली आहे. ठिकठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खच साचला असून, याकडे कोणाचेही लक्ष नाही.
सचिन काकडे ।
सातारा : लक्ष्मी टेकडी येथील पालिकेचा गृहनिर्माण प्रकल्प सध्या समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. येथे उभारण्यात आलेल्या सदनिकेच्या खिडक्या, दरवाजे, जलवाहिन्या, फरशी यासह बांधकामाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. इतकेच नव्हे तर रात्र होताच घरकुलांमध्ये पत्त्यांचे डाव रंगत असून, मद्यपींची बैठकही बसत आहे. चोरीच्या घटनांनी प्रशासन हतबल झाले असून, ‘आपण हक्काच्या घरात कधी जाणार?’ असा प्रश्न झोपडपट्टीधारकांपुढे उभा ठाकला आहे.
पालिकेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानांतर्गत भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी व लक्ष्मीटेकडी येथे घरकुलांची उभारणी केली आहे. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत ११० घरकुले असून, त्यांचे पाच इमारतीत तर लक्ष्मीटेकडी येथे ३५२ घरकुले असून, त्याचे अकरा इमारतीत विभाजन केले आहे. पालिकेने ड्रॉ काढून लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा दिला आहे. लक्ष्मीटेकडी येथील घरकुुलाच्या इमारतींचे काम पूर्ण झाले असून, प्लास्टर, फरशी, खिडक्या, दारे, स्वच्छतागृह आदी कामे सुरू आहेत. परंतु पूर्ण होण्याअगोदरच वीस कोटींच्या या गृहनिर्माण प्रकल्पाला समस्यांचे ग्रहण लागले आहे.
घरकुलाची दारे, लोखंडी खिडक्या, ड्रेनेज पाईपलाईन, बांधकामाचे साहित्य, बांबू, विटा, लोखंडी सळया आदी साहित्यांची चोरी झाली असून, असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. काही विघ्नसंतोषींकडून इमारतीची मोडमोडही करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या घरकुलांमध्ये पत्त्यांचे डाव रंगत आहेत. मद्यपींसाठी ही घरे म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती बनली आहे. ठिकठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खच साचला असून, याकडे कोणाचेही लक्ष नाही. चोरीच्या घटनांमुळे प्रशासन हतबल झाले असून, इमारत पूर्ण होऊनही झोपडपट्टीधारकांचा हक्काच्या घरासाठी संघर्ष सुरूच आहे.
इमारत बांधकामाचा ठेका खासगी कंपनीला दिला असून, सध्या वीज, पाणी, रस्ता, स्वच्छतागृह, प्लास्टर, रंगरंगोटी आदी कामे सुरू आहेत. ही कामे पूर्णत्वास आल्यानंतरच झोपडपट्टीधारकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी येथे सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
काम मार्गी लावण्याचे आव्हान
घरकुल योजनेचे काम तब्बल सहा वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ही योजना अद्याप पूर्णत्वास आली नाही. कामाची गती जर अशीच राहिली तर वेळ व खर्च दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते. साहित्य चोरीमुळे प्रशासनाला मोठी आर्थिक झळही बसत आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.
- घरकुल योजनेच्या कामास २०१४ रोजी प्रारंभ झाला.
- सहा वर्षांत केवळ इमारतीचेच काम पूर्ण झाले.
- घरकुलाचे विभाजन एकूण अकरा इमारतीत केले आहे.
- एका इमारतीत ३२ तर एकूण ३५२ घरकुल आहेत.
- हा प्रकल्प तब्बल २० कोटी रुपयांचा आहे.
पूर्वी या ठिकाणी चोरीचे प्र्रमाण अधिक होते. मात्र, प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यानंतर हे प्रमाण कमी झाले आहे. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने घरकुुल योजनेचे काम लवकरात-लवकर मार्गी लावले जाईल.
- शंकर गोरे, मुख्याधिकारी