रात्र वैऱ्याची आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:13+5:302021-06-28T04:26:13+5:30

अनेक राजकीय उलथापालथी, सत्तापालट, त्याच्या घडामोडी या रात्रीच्या अंधारातच घडल्याचा इतिहास सांगतो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणातही चमत्काराची परंपरा ...

The night is hostile! | रात्र वैऱ्याची आहे!

रात्र वैऱ्याची आहे!

Next

अनेक राजकीय उलथापालथी, सत्तापालट, त्याच्या घडामोडी या रात्रीच्या अंधारातच घडल्याचा इतिहास सांगतो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणातही चमत्काराची परंपरा आहे. आता याच कारखान्याची निवडणूक मंगळवारी (दि. २९) होत आहे. त्यामुळे सोमवारची रात्र वैऱ्याची असल्याची भावना तीनही पॅनलचे नेते व कार्यकर्ते यांच्यात आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होत आहे. सत्ताधारी डाॅ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल यांच्यात ही लढत होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक प्रचारात अनेक अडथळे आले. पण, ही अडथळ्यांची शर्यत पार करीत तीनही पॅनेलने प्रचारात मुसंडी मारली आहे. आता तीनही पॅनेलचे समर्थक विजयाचा दावा करीत आहेत. पण मतदानाच्या अगोदरच्या रात्री काहीही गडबड होऊ शकते, असे खासगीत बोलताना दिसतात.

गेले महिनाभर सर्वच पॅनलचे नेते कार्यकर्ते प्रचारात सक्रिय दिसत आहेत. कोपरा सभा, पदयात्रा, जाहीर सभा, थेट मतदार भेट यात सगळे व्यस्त आहेत. एक एक मत महत्त्वाचे आहे याची जाणीव त्यांना आहे. पण अगोदरच्या रात्री महिनाभर केलेल्या परिश्रमावर पाणी फिरायला नको म्हणून नेत्यांनी कार्यकर्त्यांना डोळ्यात तेल घालून सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचे समजते. आपण दिवसा सावध पण रात्री गाफील असतो. पण निवडणुकीच्या आदल्या रात्रीचा गाफीलपणा परवडणारा नाही हे नेते जाणून आहेत.

कारखाना निवडणुकीत सुरुवातीला डॉ. भोसले यांना रोखण्यासाठी दोन माजी अध्यक्ष मोहिते यांच्या मनोमिलनसाठी प्रयत्न झाला. मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर दोन्ही मोहिते यांनी सत्ताधारी भोसले गटाला थोपविण्यासाठी रणनीती तयार केली व ते प्रचाराला लागले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तीन मंत्री व मातब्बर नेते येतात. मात्र, यापैकी दोन मंत्री शांतच आहेत. त्यांचा आदल्या रात्री या निवडणुकीत काही हस्तक्षेप होणार का? याची चर्चा सुरु आहे.

सत्ताधारी सहकार पॅनेल तर सर्व बाजूंनी सबळ आहे. भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने कृष्णा कारखान्याची सत्ता त्यांच्या हाती असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे साहजिकच त्यांनी या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दुसऱ्या बाजूला सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या निवडणुकीत सक्रिय होत डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलसाठी रान तापविले आहे. त्यांनी अनेक भाषणातून साम, दाम, दंड या नीतीचा वापर करून ही निवडणूक जिंकायची आहे. असा संकेत दिला आहे. तर अविनाश मोहिते यांच्या मागेही छुपी ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणीच कोणाला कमी दिसत नाही.

कृष्णाची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे. ‘कृष्णासाठी काय पण’ ... अशी त्यांची भूमिका आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी सोमवारची रात्र ही शेवटची संधी आहे. या रात्री कोण काय करेल याचा कोणाचाच कोणावर विश्वास नाही. त्यामुळे सोमवारची रात्र वैऱ्याची आहे. ही भावना तीनही पॅनेलच्या कार्यकर्त्यांच्यात आहे. आता ही रात्र नक्की कोणासाठी वैरी ठरते हे निकालानंतरच कळेल.

प्रमोद सुकरे, कऱ्हाड

Web Title: The night is hostile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.