मद्यपान करत हवेत गोळीबार करणाऱ्या नऊ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:32 AM2021-06-07T10:32:36+5:302021-06-07T10:34:42+5:30
Crimenews Satara : खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्यपान पार्टीचे आयोजन करीत दारु पिऊन हवेत रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील बारामती व सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नऊ जणांच्या टोळक्याला शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिरवळ/सातारा : खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्यपान पार्टीचे आयोजन करीत दारु पिऊन हवेत रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील बारामती व सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नऊ जणांच्या टोळक्याला शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याघटनेप्रकरणी किरण देविदास निगडे (वय 46 रा.गुळूंचे ता.पुरंदर जि.पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय 28, रा. कानिफनाथवस्ती, भादे ता. खंडाळा),नवनाथ बबन गाडे (वय 34, रा.चोपडज,पोस्ट करंजे, ता.बारामती जि.पुणे), माधव अरविंद जगताप (वय 32,रा.वाकी पोस्ट करंजे ता.बारामती जि.पुणे), तात्याराम अर्जून बनसोडे (वय 38,रा.अंथूर्णे ता.इंदापूर जि.पुणे), विजय ज्ञानदेव साळूंखे (वय 39,रा.चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे ता.बारामती जि.पुणे),योगेश प्रकाश रणवरे (वय 42, रा.राख ता.पुरंदर जि.पुणे),वसंत नामदेव पवार (वय 47,रा.कोळविहीरे ता.पुरंदर जि.पुणे),अरविंद घनशाम बोदेले (वय 41,सध्या रा.लवथळेश्वर ,जेजूरी ता.पुरंदर जि.पुणे मूळ रा.भिवापूर जि.नागपूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
यामध्ये किरण निगडे यांच्या मालकीची शासनाची परवान्याची मुदत संपलेली रिव्हाँल्व्हर,दोन कार,मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किरण निगडे याने स्वत: दहशत पसरविण्याच्या उद्देशाने रिव्हाँल्व्हरद्वारे हवेत गोळीबार करीत बेकायदेशीररित्या मिञ योगेश रणवरे याला रिव्हाँल्व्हर देत त्यानेही हवेत गोळीबार करीत वीर धरण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत पोलीसी खाक्या दाखविला.
याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्यासह नऊ जणांविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ,भारतीय शस्ञ अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.