मद्यपान करुन हवेत गोळीबार करणाऱ्या नऊजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:32+5:302021-06-09T04:48:32+5:30

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्य पार्टीचे आयोजन करत हवेत रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ...

Nine arrested for firing in the air after drinking alcohol | मद्यपान करुन हवेत गोळीबार करणाऱ्या नऊजणांना अटक

मद्यपान करुन हवेत गोळीबार करणाऱ्या नऊजणांना अटक

Next

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्य पार्टीचे आयोजन करत हवेत रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील बारामती व सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नऊजणांच्या टोळक्याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेप्रकरणी किरण देविदास निगडे (वय ४५, रा. गुळुंचे, ता. पुरंदर, जि. पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळुंखे (२८, रा. कानिफनाथ वस्ती, भादे, ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (३४, रा. चोपडज, पोस्ट करंजे, ता. बारामती, जि. पुणे), माधव अरविंद जगताप (३२, रा. वाकी, पोस्ट करंजे, ता. बारामती, जि. पुणे), तात्याराम अर्जुन बनसोडे (३८, रा.अंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे), विजय ज्ञानदेव साळुंखे (३९, रा. चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे, ता. बारामती, जि. पुणे), योगेश प्रकाश रणवरे (४२, रा. राख, ता. पुरंदर, जि. पुणे), वसंत नामदेव पवार (४७, रा. कोळविहिरे, ता. पुरंदर, जि. पुणे), अरविंद घनशाम बोदेले (४१, सध्या रा. लवथळेश्वर, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ रा. भिवापूर, जि. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यामध्ये किरण निगडे यांच्या मालकीची शासनाची परवान्याची मुदत संपलेली रिव्हाॅल्व्हर, दोन कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किरण निगडे याने स्वत: दहशत पसरविण्याच्या उद्देशाने रिव्हाॅल्व्हरद्वारे हवेत गोळीबार करत बेकायदेशीररित्या मित्र योगेश रणवरे याला रिव्हाॅल्व्हर देत त्यानेही हवेत गोळीबार करत वीर धरण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत पोलिसी खाक्या दाखवला.

याप्रकरणी शिरवळ पोलीस स्थानकाचे पोलीस हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्यासह नऊजणांविरुध्द शिरवळ पोलीस स्थानकात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय शस्त्र अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत.

Web Title: Nine arrested for firing in the air after drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.