मायणीत नऊ दिवस ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:37 AM2021-05-01T04:37:19+5:302021-05-01T04:37:19+5:30
मायणी : मायणीसह परिसरामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गावातील अनेक भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने स्थानिक प्रशासनाने १ ...
मायणी : मायणीसह परिसरामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गावातील अनेक भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने स्थानिक प्रशासनाने १ ते ९ मेपर्यंत सलग नऊ दिवस ‘जनता कर्फ्यू’जाहीर केला आहे. यात केवळ वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे.
येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीसपाटील, गावकामगार तलाठी, कोरोना कमिटी यांची संयुक्त बैठक गुरुवारी सायंकाळी घेण्यात आली. या बैठकीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारपासून सलग नऊ दिवस जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार स्थानिक प्रशासनामार्फत संबंधित शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, बॅंका, पतसंस्था, तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यासाठी व स्थानिक प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
या जनता कर्फ्यूदरम्यान वैद्यकीय सेवा देणारी रुग्णालये, औषध दुकाने वगळण्यात आली असून, इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तसेच जनता कर्फ्यूदरम्यान कोणीही बाहेर फिरणार नाही, अत्यावश्यक कारणासाठी बाहेर येताना मास्क वापरणे गरजेचे आहे. बिगरमास्क आढळल्यास अथवा विनाकारण बाहेर फिरत असताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा स्थानिक प्रशासनाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.
चौकट
खरेदीसाठी गर्दी
जनता कर्फ्यू शनिवारपासून असल्याने स्थानिक प्रशासनाकडून ग्रामस्थांना आपल्या गरजेचे साहित्य १ तारखेपूर्वी खरेदी करून घ्यावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे शुक्रवार, दि. ३० रोजी सकाळी सात ते अकरा या वेळेत बाजारपेठेत एकच गर्दी उसळली होती.
फोटो संदीप कुंभार यांनी मेल केला आहे.
मायणीतील स्थानिक प्रशासनाने १ मेपासून ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. (छाया : संदीप कुंभार)