नऊ ते अकरा.. नियम सारे विसरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:04+5:302021-04-26T04:36:04+5:30
सातारा : प्रशासनाने संचारबंदीचे नियम कितीही कठोर केले तरी नागरिक व दुकानदारांकडून या नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. ...
सातारा : प्रशासनाने संचारबंदीचे नियम कितीही कठोर केले तरी नागरिक व दुकानदारांकडून या नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. अत्यावश्यक सेवांना सकाळी सात ते अकरा असे वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे या चार तासांत साताऱ्याची बाजारपेठ गर्दीने गजबजून जात आहे. या गर्दीत फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत असून, ‘नऊ ते अकरा.. नियम सारे विसरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली असून, निर्बंधही कठोर केले आहेत. अत्यावश्यक सेवांवरही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत नागरिक किराणा व भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु साताऱ्यात शासनाने सर्व नियम पायदळी तुडविले जात आहे.
बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडत आहे. किराणा दुकानांच्या बाहेर रांगा लागत आहेत. नागरिक व दुकानदारांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. शहरातील राजवाडा, तांदूळआळी, मार्केट यार्ड व बाजार समितीचा परिसर गर्दीने गजबजून जात आहे. खरेदीच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. एकीकडे जिल्ह्यासह शहरात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे नागरिकांचा निष्काळजीपणा कोरोनाचे संक्रमण रोखण्याऐवजी तो वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू लागला आहे. कारवाई करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने आता प्रशासनही हतबल झाले आहे.
(पॉईंटर)
१. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व नागरिकांकडून पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.
२. सकाळी ११ वाजता अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद करण्याचे आदेश असताना काही दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत.
३. शहरातील सर्व अंतर्गत रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची भलतीच त्रेधातिरपीट उडत आहे.
४. हॉटेल चालकांना पार्सल सुविधा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांअभावी शहरातील बहुतांश हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत.
फोटो : २५ जावेद खान
संचारबंदीचे नियम पायदळी तुडवून साताऱ्यातील बाजारपेठेत रविवारी सकाळी नागरिकांची खरेदीसाठी अशी गर्दी झाली होती. (छाया : जावेद खान)