रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:36 PM2020-02-10T16:36:05+5:302020-02-10T16:37:04+5:30
रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तीन युवकांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीमध्ये सातारा, सांगली आणि लखनौमधील संशयितांचा समावेश आहे.
सातारा : रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तीन युवकांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीमध्ये सातारा, सांगली आणि लखनौमधील संशयितांचा समावेश आहे.
जैनउद्दीन मोहमद मुजावर (रा. काशीळ, ता. सातारा), अजित अर्जुन खंडागळे (रा. पुणे), विश्वजित माने (रा. आष्टा, जि. सांगली), सौरभ त्रिपाठी (रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नीलेश विठ्ठल भणगे (वय २४, रा. आकोशी, ता. वाई) याची वरील तिघांसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून मुजावर व त्याच्या दोन मित्रांनी ह्यआम्ही रेल्वेमध्ये तुला क्लार्क म्हणून नोकरीस लावतो. तुला तीन लाख रुपये द्यावे लागतील,ह्ण असे सांगितले.
नीलेशने आरटीजीएस करून संबंधितांना पैसे दिले. याची माहिती नीलेशच्या दोन मित्रांना समजल्यानंतर त्यांनीही संबंधितांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी प्रत्येकी तीन लाख रुपये दिले. काही दिवसानंतर वरील तिघा संशयितांनी नीलेशसह त्याच्या मित्रांना बनावट ओळखपत्र दिले. हा प्रकार तिघा मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली.