Satara: ड्रग्ज प्रकरणात दोन परदेशी नागरिकांसह आणखी नऊ अटकेत, कऱ्हाडच्या पोलिसांची मुंबईत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:43 IST2025-02-17T12:43:41+5:302025-02-17T12:43:54+5:30
संशयितांकडून पोलिसांनी आणखी २० ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केले

Satara: ड्रग्ज प्रकरणात दोन परदेशी नागरिकांसह आणखी नऊ अटकेत, कऱ्हाडच्या पोलिसांची मुंबईत कारवाई
कऱ्हाड : ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांसह आणखी नऊजणांना अटक केली आहे. कऱ्हाडच्या संयुक्त पोलिस पथकाने मुंबईत ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या नऊ संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या संशयितांकडून पोलिसांनी आणखी २० ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केले आहे.
अमित अशोक घरत (वय ३१, रा. करांजडे, ता. पनवेल, जि. रायगड), दीपक सुभाष सूर्यवंशी (४३, रा. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. तुर्भे, मुंबई), बेंजामिन ॲना कोरू (४४, रा. कोपरखैरणे नवी मुंबई), रोहित प्रफुल्ल शहा (३१, रा. शनिवार पेठ, माळी कॉलनी, कऱ्हाड), सागना इ मॅन्युअल (३९, रा. घणसोली, नवी मुंबई), नयन दिलीप मागाडे (२८, रा. डोंबिवली पूर्व, जि. ठाणे), प्रसाद सुनील देवरुखकर (३०, रा. पावस्कर गल्ली, कऱ्हाड), संतोष अशोक दोडमणी (२२, रा. सैदापूर, ता. कऱ्हाड), फैज दिलावर मोमीन (२६, रा. मार्केट यार्ड, कऱ्हाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अटकेत असलेल्या एकूण संशयितांची संख्या आता बारा झाली आहे.
संशयितांकडून आतापर्यंत सुमारे ३० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी पोलिसांनी राहुल अरुण बडे (वय ३७, र. पाण्याच्या टाकीजवळ, सोमवार पेठ, कऱ्हाड), समीर ऊर्फ सॅम जावेद शेख (२४, रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कऱ्हाड), तौसिब चाँदसो बारगीर (२७, रा. अष्टविनायक मंगल कार्यालयानजीक, कार्वेनाका, कऱ्हाड या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
तीन पथकांनी केला तपास
एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी तीन पथके तयार केली. त्यामध्ये उपअधीक्षक कार्यालयाचे पथक, कऱ्हाड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आणि उंब्रज पोलिस ठाण्याचे पथक होते. त्यापैकी मुंबईला गेलेल्या पथकांनी दोन परदेशी नागरिकांसह पाचजणांना मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातून ताब्यात घेतले, तर दुसऱ्या दोन पथकांनी आणखी चारजणांना ताब्यात घेऊन अटक केली.