कऱ्हाडच्या अभ्यासिकेतून नऊ जण शासन सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:28+5:302021-03-07T04:35:28+5:30
कऱ्हाड : येथील पालिकेच्या वाचनालयात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतून नऊ विद्यार्थी शासन सेवेत दाखल झाले आहेत. नगराध्यक्षा रोहिणी ...
कऱ्हाड : येथील पालिकेच्या वाचनालयात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतून नऊ विद्यार्थी शासन सेवेत दाखल झाले आहेत. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्र यादव, बांधकाम सभापती हणमंत पवार, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बाल कल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक विनायक पावस्कर, ग्रंथपाल संजय शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत अभ्यासिका खुली असते. सध्या नगरवाचनालयाच्या अभ्यासिकेचा लाभ ८० विद्यार्थी घेत आहेत.
सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याची दुरवस्था
कऱ्हाड : येथील कऱ्हाड-विटा मार्गावरील सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी यादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघातांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र तेथून पुढे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नाल्यांची दुरवस्था
कऱ्हाड : पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. मलकापूर, नांदलापूर, पाचवड फाटा, आटके, नारायणवाडी, वाठार, मालखेड अशा ठिकाणी गटारात कचरा साचत आहे.
प्रवासी शेडची मागणी
कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड-ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड-पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विभागाने एसटी थांबा प्रवासी शेड हटविलेले आहे. उन्हाळ्यात शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना उघड्यावर उभे राहून एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रवासी शेड हटविलेले आहेत अशा ठिकाणी तत्काळ शेड उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
रस्ते होताहेत चकाचक
कऱ्हाड : शहरात सध्या पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची, बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचीही आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक रस्ते, दुभाजक, पादचारी मार्गावर अग्निशमन बंबाच्या साह्याने वेळोवेळी औषध फवारणी तसेच पाणी मारून स्वच्छता केली जात आहे. तसेच ज्या ठिकाणी कचरा साचतो तो परिसरही पालिकेकडून स्वच्छ केला जात आहे.
कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर थांब्याची गरज
कऱ्हाड : येथील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसरात बस थांबा गरजेचा आहे. या परिसरात सद्य:स्थितीत कोल्हापूर बाजूकडून येणाऱ्या एसटी तसेच अन्य वाहने सेवा रस्ता तसेच महामार्गाकडेला थांबतात. त्याचबरोबर पुणे तसेच मुंबईकडे जाणारे प्रवासीही वाहनांची वाट पाहत महामार्गालगत उभे असतात. या परिसरात वाहनांचा वेग प्रचंड असतो. त्यामुळेच अपघाताचा धोका नेहमी असतो.
उपमार्गावर अस्ताव्यस्त पार्किंग
मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
बनवडीत माळी महासंघाच्या वतीने सत्कार (फोटो : ०६इन्फो०१)
कऱ्हाड : राज्यस्तरीय माळी महासंघाच्या वतीने बनवडीचे सरपंच प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, राज्य सरचिटणीस अॅड. दीपकराव माळी-मुंढेकर, राज्य चिटणीस उत्तमराव माळी, जिल्हाध्यक्ष संपतराव माळी, उपजिल्हाध्यक्ष हरिदास माळी, कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष राजू पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव विधाते, बाबासाहेब माळी, अॅड. रोहित माळी, संजय तडाखे उपस्थित होते.