वादळी वाऱ्यासह पावसाने नऊ खांब जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:58+5:302021-05-09T04:40:58+5:30
रहिमतपूर : मान्सूनपूर्व गारांच्या वादळी पावसाने कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला सुमारे पाऊण तास जोरदार तडाखा दिला. पावसाने साप व ...
रहिमतपूर : मान्सूनपूर्व गारांच्या वादळी पावसाने कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला सुमारे पाऊण तास जोरदार तडाखा दिला. पावसाने साप व पिंपरी येथील पाच झाडे पडली असून, नऊ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे विजेचा खेळखंडोबा झाला आहे. झाडे रस्त्यावर पडल्याने साप व पिंपरी येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रहिमतपूर परिसरात शनिवारी सकाळपासूनच कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावणेतीनच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केली होती. बघता बघता वादळी वाऱ्याबरोबरच विजांचा कडकडाट सुरू होता. गारांच्या तडाख्यासह जोरदार पावसाने सुरुवात केली. रहिमतपूर शहरासह साप, वेळू, बेलेवाडी, अपशिंगे, पिंपरी, अंभेरी, आदी गावांना पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे साप येथे ग्रामपंचायत चौक ते बसस्थानक या दरम्यानच्या रस्त्याकडेची दोन झाडे वीजवाहक तारांवर पडल्याने विजेचे दोन खांब रस्त्यावरच कोसळले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती. वाहनधारक पर्यायी रस्त्याचा ये - जा करण्यासाठी वापर करत होते. तसेच आटाळी नावाच्या शिवारातील आंब्याचे झाड विजेच्या मुख्य वाहिनीवर पडल्याने सर्व वीजवाहक तारा तुटल्या आहेत.
वीज खांब पडल्याची माहिती मिळताच वायरमन नीलेश लावंड घटनास्थळी हजर झाले. दोन कर्मचाऱ्यांसह जोडणीच्या कामाला सुरुवात केली. पिंपरी येथील माळवाडी ते विहिरीवर जाणाऱ्या रस्त्यावरील तीन झाडे वीजवाहक तारांवर पडल्याने तब्बल सात वीज खांब कोसळले. यामधील एक सिमेंटचा खांब घराजवळ मधोमध तुटून रस्त्यावरच कोसळला. त्यामुळे वीजवाहक तारा रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पडझडीची माहिती मिळताच वीज वितरणचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी हजर झाले होते.
चौकट :
तीन लाखांचे नुकसान
पावसामुळे वीज खांब कोसळल्याची माहिती मिळताच वीज वितरणचे कर्मचारी घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या पाहणीत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शेतासह इतर ठिकाणचा सर्व्हे केल्यानंतरच निश्चित नुकसानीचा आकडा समजू शकेल. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री सातपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती रहिमतपूर वीज वितरण उपविभागाचे सहायक अभियंता युवराज वाघ यांनी दिली.
०८रहिमतपूर-रेन
पिंपरी, ता. कोरेगाव येथे शनिवारी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे माळवाडी रस्त्यावर झाड पडले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. (छाया : जयदीप जाधव)