रेठरे हरणाक्ष-बाेरगावमधून नऊ महिला इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:33+5:302021-06-06T04:29:33+5:30
शिरटे : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महिला राखीव गटामध्ये रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटामधून तब्बल नऊ महिला उमेदवार इच्छुक आहेत. ...
शिरटे : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महिला राखीव गटामध्ये रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटामधून तब्बल नऊ महिला उमेदवार इच्छुक आहेत. काही उमेदवारांनी आपली उमेदवारी निश्चित मानून प्रचारास सुरुवात केली आहे, तर काही अजूनही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत.
कृष्णाच्या संचालक मंडळात दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यापैकी एक उमेदवारी या गटात मिळणार, हे निश्चित आहे. सहकार पॅनलकडून विद्यमान संचालिका जयश्री माणिकराव पाटील, प्रा. संगीता सुनीता पाटील (बहे), डॉ. किशोरी दीपक मोहिते (बिचूद), संस्थापक पॅनलकडून बहेचे माजी संचालक संभाजी दमामे यांच्या पत्नी मीनाक्षीदेवी संभाजी दमामे, बोरगावचे माजी संचालक उदयसिंह शिंदे यांच्या पत्नी स्नेहल उदयसिंह शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
रयत पॅनलकडून कृष्णाचे माजी उपाध्यक्ष राजेसाहेब थोरात यांच्या स्नुषा सत्त्वशीला उदयसिंह थोरात, बहे येथील नानासाहेब महाडिक पतसंस्थेचे व्यवस्थापक मानसिंग पाटील यांच्या मातोश्री व बहेच्या माजी उपसरपंच सावित्री शिवाजी पाटील, माजी संचालक पैलवान हणमंतराव पाटील-शिरटेकर यांच्या स्नुषा सुरेखा जयकर पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.
कामेरी येथील जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा छायाताई पाटील यांनी रयतकडून रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातून सर्वसाधारण गटातून, तर मीनाक्षीदेवी संभाजी दमामे यांनी संस्थापककडून महिला राखीव व सर्वसाधारण गटातून उमेदवारी मागितली आहे.
लढत दुरंगी की तिरंगी हाेणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. तिन्ही गटांतील सर्वच महिलांना राजकीय वारसा असून, सर्वसाधारणप्रमाणे या गटातील लढतीकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.