नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी -आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:46 PM2018-06-19T23:46:53+5:302018-06-19T23:46:53+5:30

केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी

 Ninth pass doctor pregnancy test - arrest of Aopoli | नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी -आरोपीला अटक

नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी -आरोपीला अटक

Next
ठळक मुद्देसोनोग्राफी मशीन घेऊन मोटारसायकलवर फिरता दवाखाना

सातारा : केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी भागात मोटारसायकलवर फिरून तो हा गोरख धंदा करायचा.

याबाबत माहिती अशी की, औंध परिसरात नाथा सहदेव खाडे (वय ३१, रा. धामणी, पो. पिंपरी, ता. माण) हा मोटारसायकलीवर पाठीमागे पिवळ्या रंगाची मोठी सॅक घेऊन संशयितरीत्या फिरत होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोना स्टार कंपनीचे सोनोग्राफी मशीन, मोटारसायकल (एमएच ११ सीएन ५९०६) आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. गर्भलिंग निदान करण्यासाठी तो दुष्काळी भागातील गावोगावी मोटारसायकलवर मशीन घेऊन फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला.

तो केवळ नववी पास असून त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. तरीही मशीनद्वारे गर्भवती महिलांची गर्भलिंग निदान तपासणी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या दुष्काळी भागातील एका डॉक्टरकडे काम करत असताना त्याने निदानाची तांत्रिक माहिती घेतली होती. दरम्यान, तपासणीनंतर गर्भपातासारखे प्रकार केले गेले काय, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतिराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, रवी वाघमारे, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, मोनाली जाधव, प्रवीण कडव, गणेश कचरे, मारुती अडागळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

अवघ्या पाच हजारांत घरपोच सेवा
नाथा खाडे हा काही महिन्यांपूर्वी औंध परिसरातील एका डॉक्टरकडे काम करत होता. त्याच्या हाताखालीच त्याने गर्भलिंग तपासणीचे प्रशिक्षण घेतले. त्या ठिकाणी कॉन्टॅक्टचा वापर करत होता. लोकांनी त्यांना फोन केल्यानंतर तो त्यांना घरपोच सेवा देत होता. अवघ्या पाच हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंत तो गर्भलिंग तपासणी करून देत होता.

Web Title:  Ninth pass doctor pregnancy test - arrest of Aopoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.