नीरा उजवा कालवा बंद; पिके धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:11+5:302021-07-08T04:26:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावांच्या पिण्याचे पाणी योजना नीरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावांच्या पिण्याचे पाणी योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असून, कालवा बंद झाल्यानंतर १५ दिवसांपेक्षा अधिक काळ या सर्व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित राहू शकत नाहीत. दि. २१ जून रोजी कालवा बंद झाला असून, दि. ५ ते ६ जुलैला पुन्हा सुरु होणे अपेक्षित असताना कालवा सुरू न झाल्याने तालुक्याच्या बागायती पट्ट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातही पिण्याच्या पाण्याची ३० टक्के कपात झाली आहे.
फलटण शहर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावातील पाणीसाठा मर्यादित असून, कालव्यात पाणी सोडले गेले नाही तर पुढील आठवड्यात शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या शहरात कालव्यात पाणी नसल्याने ३० टक्के पिण्याच्या पाण्याची कपात केली आहे.
दरम्यान, तरडगाव, साखरवाडी, विडणी, कोळकी वगैरे मोठ्या गावांसह अन्य छोट्या गावांच्या पिण्याच्या पाणी योजना आगामी दोन-तीन दिवसांत अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कोळकी गावात आताच चार दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे.
नीरा उजवा कालवा विभागाकडे चौकशी केली असता दि. १५ जुलैदरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दि. १५ जुलै म्हणजे आणखी आठ-नऊ दिवस कालव्यात पाणी सोडले जाणार नसल्याने तालुक्यातील ३५ ते ४० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या वर्षीच्या हंगामात तुटणारा ऊस, आता तुटलेल्या उसाचा खोडवा, जूनमध्ये झालेल्या उसाच्या लागणीसाठी आणि आता दि. १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऊसलागणीसाठी तसेच चारा व खरिपातील अन्य पिकांसाठी कालव्याच्या पाण्याची तातडीने आवश्यकता असताना कालवा दि. १५ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याने बागायती पट्ट्यातील शेतकरी धास्तावला आहे.
चौकट..
वीर धरणात सुमारे ५० टक्के पाणी उपलब्ध
फलटण तालुक्यात आत्तापर्यंत अपेक्षित पाऊस न झाल्याने बागायत पट्ट्यातील पेरणी कालव्यात पाणी नसल्याने अडचणीत आली आहे. कालव्यात पाणी आले नाही, मात्र पाऊस जोरात झाला तर उगवण होणाऱ्या आणि झालेल्या पिकांना फायदा होऊ शकतो.
वीर धरणात सुमारे ४५ ते ५० टक्के पाणी उपलब्ध आहे. फलटण तालुक्याच्या वाट्याचे उन्हाळी हंगामाचे पाणी शिल्लक असल्याने नीरा उजवा कालवा विभागाने तातडीने नियोजन करून आगामी एक-दोन दिवसांत नीरा उजवा कालव्याचे पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामपंचायत क्षेत्रातून होत आहे.
०७फलटण
फलटण शहर व तालुक्यातील नीरा उजवा कालवा बंद असल्याने पिके धोक्यात आली आहेत.