नितीन पाटील राज्यसभेचे बिनविरोध खासदार जाहीर; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र
By नितीन काळेल | Published: August 26, 2024 08:03 PM2024-08-26T20:03:42+5:302024-08-26T20:05:31+5:30
जिल्ह्यात आज ठिकठिकाणी जंगी स्वागत
सातारा : सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे राज्यसभेचे उमेदवार नितीन पाटील यांच्या खासदारकीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना प्रमाणपत्र सादर केले. दरम्यान, राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर नितीन पाटील हे मंगळवारी सातारा जिल्ह्यात प्रथमच येणार आहेत. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुवेळी नितीन पाटील हे राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडून दावेदार होते. पण, मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने नितीन पाटील नाराज झाले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईतील महायुतीच्या प्रचारसभेत नितीन पाटील यांना राज्यसभेत खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पवार यांनी शब्द पाळला. तसेच नितीन पाटील यांची बिनविरोध खासदार म्हणूनही निवड झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यात आणखी ताकद वाढणार आहे.
शिंदेवाडीतून स्वागताला सुरुवात...
खासदार झाल्यानंतर नितीन पाटील हे मंगळवार, दि. २७ रोजी सातारा जिल्ह्यात प्रथमच येत आहेत. त्यामुळे नितीन पाटील यांचे पुणे-बंगळूरु महामार्गावर ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे स्वागत होईल. त्यानंतर शिरवळ, खंडाळा, वेळे, कवठे, भुईंज, पाचवड याठिकाणी स्वागत होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता साताऱ्यातील बाॅंबे रेस्टाॅरंट चाैकात सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्ते पेढेतुला करुन स्वागत करणार आहेत. या कार्यक्रमानंतर त्यांचे काशीळ, इंदोली, उंब्रज येथेही स्वागत होणार आहे. सायंकाळी चारनंतर कऱ्हाड येथे प्रीतिसंगमवर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नितीन पाटील जाणार आहेत.