अखेर ठरलं : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 12:02 PM2021-12-06T12:02:58+5:302021-12-06T12:29:24+5:30
जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती.
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेचीनिवडणूक झाली असली तरी अध्यक्ष निवडीवरून रस्सीखेच सुरु होती. जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर यावर तोडगा निघाला.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
सहकार पॅनेलच्या छत्राखाली विविध पक्षांनी एकत्रित निवडणूक लढली. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील साताऱ्यात येऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमधील राजकारण तापले होते. यात आमदार शशिकांत शिंदे यांचा या निवडणुकीत अवघ्या एका मतांनी धक्कादायक पराभव झाला होता. यामुळे जिल्हा बँकेतील राजकारण चांगलेच तापले होते. अध्यक्षपदाच्या निवडीवरुन गेल्या चार-पाच दिवसांपासून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. या सर्व चर्चेना अखेर पुर्ण विराम मिळाला.