नितीन पाटील यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड

By नितीन काळेल | Published: August 22, 2024 07:01 PM2024-08-22T19:01:16+5:302024-08-22T19:03:04+5:30

घोषणेची औपचारिकता बाकी, सातारा जिल्ह्याला तिसरा खासदार

Nitin Patil of NCP's Ajit Pawar faction was elected unopposed as Rajya Sabha MP | नितीन पाटील यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड

नितीन पाटील यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे अर्ज छाननीनंतर राज्यसभेचे बिनविरोध खासदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत घोषणेचीच आैपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे नितीन पाटील यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला तिसरा खासदारही मिळणार आहे. 

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा देण्यात आली. या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी मुंबईत उमेदवारी अर्ज भरला होता.

गुरूवारी दाखल अर्जांची छाननी झाली. यामध्ये पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. तसेच अन्य एकाने अर्ज भरलेला. पण, तो छाननीत बाद झाला. यामुळे नितीन पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवड झाल्याचेच स्पष्ट होत आहे. याबाबत घोषणा होणेच बाकी आहे.
वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे नितीन पाटील हे बंधू आहेत. मागील काही वर्षांपासून ते जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. तसेच नितीन पाटील यांचे वडील दिवंगत लक्ष्मणराव पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघाचे १९९९ पासून २००९ पर्यंत खासदार राहिले होते.

जिल्ह्यात पक्षवाढीची जबाबदारी..

आताच्या लोकसभा निवडणुकीत नितीन पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक होते. पण, जागावाटपात मतदारसंघ भाजपला गेला. त्यामुळे पाटील यांची इच्छा अपुरी राहिली. त्याचवेळी वाईतील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचा उमेदवार निवडूण आणण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी नितीन पाटील यांना राज्यसभेत खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. पवार यांनी हे आश्वासन पाळले. तसेच नितीन पाटील हे आता बिनविरोध खासदार होणार आहेत. त्यांच्यावर आता जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. आगामी काळात विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांसाठीही त्यांना तयार रहावे लागणार आहे.

Web Title: Nitin Patil of NCP's Ajit Pawar faction was elected unopposed as Rajya Sabha MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.