नितीन पाटील राज्यसभेसाठी अर्ज भरणार; महायुतीकडून जागा बिनविरोध करण्याची रणनिती
By दीपक देशमुख | Published: August 20, 2024 07:51 PM2024-08-20T19:51:58+5:302024-08-20T19:53:52+5:30
ही निवड बिनविरोध करण्यासाठी महायुतीची रणनिती असल्यामुळे नितीन पाटील खासदार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
दिपक देशमुख
सातारा : लोकसभेच्या सातारा जागेवरील दावा सोडणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून पियुष ओयल यांच्या रिक्त जागी पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नितीन पाटील मुंबईला दाखल झाले आहेत. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई विधान भवनात अर्ज भरण्यात येणार आहे. ही निवड बिनविरोध करण्यासाठी महायुतीची रणनिती असल्यामुळे नितीन पाटील खासदार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
सातारा जिल्ह्याला खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या रुपाने खंबीर नेतृत्व मिळाले होते. त्यानंतर चिरंजीव आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी त्यांची धुरा सांभाळली असून मकरंद पाटील वाई मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत तर नितीन पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील मेळाव्यात सातारा लोकसभेवर दावा सांगत नितीन पाटील यांच्या उमेदवारी देण्याचे सुतोवाच केले. परंतु, भाजपाचाही दावा मजबूत असल्यामुळे लोकसभेला उमेदवारी कोणाला द्यायची हा पेच वाढू लागला. त्यावेळी अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेत लोकसभेची जागा भाजपाला सोडली व त्याबदल्यात राज्यसभेची जागा मागून घेतली.
हा तोडगा निघाल्यामुळे लोकसभेची दावेदारी त्यांनी सोडून नितीन पाटील यांना खासदारकीसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. राज्यातील दोन जागांसह नऊ राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नितीन पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी नितीन पाटील राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी रात्री झाली. या बैठकीत एकमताने नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीला अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते उपस्थित होते.
नितीन पाटील यांना लोकसभेवेळी राज्यसभेवर घेण्याचा अजित पवार यांनी जो शब्द दिला, तो खरा केला आहे. त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असून यामुळे आम्हा कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
श्रीनिवास शिंदे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस