लिम्का बुक मध्ये नोंद झालेला महाबळेश्वरमधील 'तो' निवडूंग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 12:03 PM2021-11-20T12:03:03+5:302021-11-20T13:10:07+5:30
महाबळेश्वर : येथील शासकीय दुग्धशाळेतील सर्वात उंच निवडुंग अशी ख्याती झालेला सुमारे ४७ फूट उंच व ज्याची ख्याती भारतातील ...
महाबळेश्वर : येथील शासकीय दुग्धशाळेतील सर्वात उंच निवडुंग अशी ख्याती झालेला सुमारे ४७ फूट उंच व ज्याची ख्याती भारतातील सर्वात उंच निवडूंग म्हाणून लिम्का बुक मध्ये नोंद झाली तो वार्धक्याने नुकताच पडला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या निवडुंगाच्या झाडाने सुमारे दोन वर्षांपूर्वी दोन कोंबाना जन्म दिला. त्यातील एक कोंब सध्या सुमारे २५ फूट वाढला असून दुसरा सुमारे २० फूट वाढला आहे. ते दोन्ही ही कोंबांचे आता युवा निवडुंगाच्या झाडात रूपांतर झाले असून ही दोन्ही निवडुंगांची झाडे झपाट्याने वाढत आहेत. तसेच ते आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून आकाशाला गवसणी घ्यालण्याच्या प्रयत्नात आहे. हे दोन्ही निवडुंग भारतातील सर्वात उंच निवडून म्हणून नावारूपाला येतील असा विश्वास सध्या त्याची जोपासना करणारे या दुग्ध शाळेचे कर्मचारी नामदेव मोरे यांना वाटते. सध्या त्यांची वाढ झपाट्याने होत असून आपल्या वडिलांचाच उंची बाबतचा विक्रम मोडणार का? या बद्धल कुतुहल निर्माण झाले आहे.
महाबळेश्वरमध्ये सुमारे ५० वर्ष जुनी शासकीय दुग्धशाळा आहे. सध्या ही दुग्धशाळा बंद आहे. याच शासकीय दुग्धशाळेच्या विश्राम गृहाच्या प्रवेशद्वाराजवळच सुमारे ४७ फुट उंचीचा निवडुंग होता. तो ३७ फुट उंचीचा असताना २००७ साली भारतातील सर्वात उंच निवडूंग म्हणून याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये झाली आहे.