आधारकार्ड नाही; भिक्षेकऱ्यांना लस कशी देणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:08+5:302021-03-10T04:38:08+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू झाले असून, त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. मात्र, आधारकार्ड नसणारे भिक्षेकरी किंवा ...
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू झाले असून, त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. मात्र, आधारकार्ड नसणारे भिक्षेकरी किंवा कोणतीही कागदपत्रे नसणऱ्या बेघरांना लस मिळणार का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे असले तरी या लोकांना लस मिळण्यासाठी काही सामाजिक संस्थांही प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्यात एक मार्चपासून ६० वर्षांवरील वृद्ध आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमार्बीड व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयातही लसीकरणाची सोय करण्यात आलेली आहे, पण कोरोना लस घेण्यापूर्वी नोंदणी करावी लागते. त्यासाठी आधारकार्ड महत्त्वपूर्ण ठरते. त्या आधारेच संबंधितांना कोरोना लस देण्यात येते. असे असले तरी जिल्ह्यात भिक्षेकरी आणि बेघर असणारेही अनेकजण आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड नाही तसेच इतर कागदपत्रेही नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लस घेताच येत नसल्याचे वास्तव आहे. यामधील अनेकजण हे सामाजिक संस्थांच्या सेवा केंद्रात आहेत. त्यामुळे अशा भिक्षेकरी किंवा बेघरांना कोरोना लस मिळण्यासाठी प्रशासन तसेच शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
.....................
जिल्ह्यातील भिक्षेकरी
अंदाजे ७०
बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या
अंदाजे १२५
महिला २५
पुरुष १००
............................
आधारकार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणार
जिल्ह्यातील काही मंदिरापुढे भिक्षेकरी बसतात. त्यांच्याकडे आधारकार्ड नसते तसेच इतर ओळखपत्रेही नाहीत. त्यांना लस देताना अडचणी निर्माण होणार आहेत.
कोरोना लस घेण्यासाठी भिक्षेकऱ्यांना आरोग्य केंद्रात कोण नेणार ? हाही मुद्दा महत्त्वाचा ठरू पाहतोय. त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी कोणावरही नाही. त्यामुळे याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे.
मंदिरापुढे बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांचा पत्ता नसतो. अनेकजण ठरावीक दिवशीच मंदिरासमोर बसतात आणि जातात. त्यांच्यापर्यंत यंत्रणा पोहोचणे महत्त्वाचे ठरणार आहे.
........................................................
बेवारस असणारे अनेकजण सामाजिक संस्थांच्या ताब्यात
जिल्ह्यात बेवारस असणाऱ्यांची संख्या कमी आहे. यामधील अनेकजण हे सामाजिक संस्थांच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी त्यांची सेवा आणि शुश्रूषा करण्यात येते.
बेवारस असणाऱ्या अनेकांकडे आधारकार्ड नाही. तसेच इतर ओखळपत्रेही नाहीत. त्यामुळे ज्या संस्थांत ते राहतात, त्या संस्थांच्या माध्यमातून लसीकरण होणे महत्त्वाचे आहे.
काही संस्थांनी आपल्याकडे राहत असलेल्या बेघरांच्या कोरोना लसीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कारण, अनेक बेघर हे विकलांग आणि ७० वर्षांपुढीलही आहेत. त्यांना लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.
कोट :
अनेक बेघरांना आमच्या संस्थेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कोरोना लसीकरणासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या हमीवर संबंधितांना लसीकरण करावे. कारण, अनेकजण विकलांग व ६० वर्षांवरील आहेत.
- रवी बोडके, यशोधन ट्रस्ट, वेळे
................................................................