ओळखपत्र, मास्कशिवाय मतदान केंद्रात प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:23+5:302021-06-28T04:26:23+5:30
कऱ्हाड : ‘यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक मंगळवारी होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ ...
कऱ्हाड : ‘यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक मंगळवारी होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण १४८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. ओळखपत्र व मास्क असल्याशिवाय मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मोबाईल घेऊन येण्यास मनाई आहे,’ अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मतदानासाठी फक्त मतदारयादीमधील मतदारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी येताना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विहित केलेल्या आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, पॅनकार्ड, केंद्र, राज्य शासन सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कर्मचाऱ्यांचे फोटो ओळखपत्र, पोस्ट कार्यालयाने दिलेले फोटो असलेले पासबुक, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र, फोटो असलेले जात प्रमाणपत्र, फोटो असलेला अपंग दाखला, फोटो असलेला शस्र परवाना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी यंत्रणा फोटो असलेले जाॅबकार्ड, निवृत्त कर्मचारी फोटो पेन्शन पासबुक, आरोग्य विमा योजना फोटो असलेले स्मार्ट कार्ड यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे. मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी (मोबाईल) घेऊन जाण्यास मनाई आहे. त्यामुळे मतदारांनी केंद्रामध्ये मोबाईल घेऊन येऊ नये.
तसेच सर्व मतदारांनी कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या आदेश व निर्देश याचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. मास्क नसल्यास मतदान केंद्रामध्ये प्रवेश मिळणार नाही. याबाबत सर्व मतदार, उमेदवार, प्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.