कोरोनात व्यवसाय नको...हवी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:28+5:302021-05-16T04:38:28+5:30

कोरोना काळ सुरू झाल्यापासून त्याचे विविध टप्पे सामान्यांनी जवळून पाहिले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला समाजात चांगला मान ...

No business in Corona ... service required | कोरोनात व्यवसाय नको...हवी सेवा

कोरोनात व्यवसाय नको...हवी सेवा

Next

कोरोना काळ सुरू झाल्यापासून त्याचे विविध टप्पे सामान्यांनी जवळून पाहिले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला समाजात चांगला मान होता. पण जागतिक महामारीच्या या काळात या क्षेत्राने रुग्णांची लुबाडणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले. रुग्णांच्या नातेवाइकांचा तो स्टंट वाटला, पण अनेकदा त्यात तथ्यही आढळले. कोविडच्या उपचारांबाबत सर्वत्रच संभ्रमाची अवस्था असल्याने पहिले काही दिवस चाचपडून उपचार सुरू होते. सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचं म्हटलं की सहा आकडी अनामत रक्कम ठरलेलीच, त्याशिवाय रुग्णाला दाखलच करून घ्यायचं नाही. हा रुग्णालय व्यवस्थापना हिय्या ! आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांना कोणती औषधे आणि इंजेक्शन दिली जातात, याबाबत नातेवाइकांना काहीच समजत नाही. रुग्णांना अर्धे इंजेक्शन देऊन त्यातील वाचलेल्या इंजेक्शनचा व्यवसाय करणारे अन्न व औषध प्रशासनाच्या जाळ्यात अडकले. सापडणारी ही मंडळी हिमनगाचे टोक असल्याचं बोललं जातंय. कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा चेहरा बघण्यासाठी नातेवाइकांना ५०० रुपये मोजावे लागण्याची निच्चतम पातळीही वैद्यकीय क्षेत्राने गाठली.

शंभर वर्षांनी आलेल्या या महामारीत ‘कोविड में कमाने का नंही’ असा चंग बांधणारे डॉक्टरही साताऱ्याने पाहिले. ऑन कॉल उपचार देऊन हजारो रुग्णांना कोविडमुक्त केल्याचा कुठंही कांगावा न करता त्यांनी केलेली रुग्णसेवा अनेकांच्या स्मृतीत कायमस्वरूपी कोरली गेली आहे. आपल्या पुढच्या पिढीला जागतिक महामारीच्या वेळी आपण समाजासाठी काय केलं हे अभिमानाने सांगायचं असेल तर रुग्णांचे शोषण सोडून त्यांना पोषण देण्याचं काम वैद्यकीय व्यावसायिकांनी करावं अशी अपेक्षा सामान्य सातारकरांची आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात पैसे आणि आता दुसऱ्या टप्प्यात नाव कमविण्याच्या उपलब्ध संधीचे सोनं करणं वैद्यकीय क्षेत्राच्या हाती आहे.

चौकट :

१. बेडसाठी हजारात तर मृतांच्या मुखदर्शनासाठी पाचशेची मागणी

सातारा जंबो कोविड सेंटर हजारो रुग्णांचे आश्रयस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला विनामूल्य औषधोपचार देण्याची सोय करण्यात आली आहे, पण इथंही पैसे खाण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबत आहे. अत्यवस्थ रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. दाखल केलेल्या रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून दिल्यानंतरही खासगीतून औषधे आणण्याचा तगादा लावला जात आहे. त्याहीपेक्षा भयंकर बाब म्हणजे कोविडने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचा चेहरा नातेवाइकांना दाखविण्यासाठी चक्क ५०० रुपयांची मागणी केली जात असल्याने या क्षेत्रातील काळाबाजार पुढे आला. जागतिक महामारीत ज्यांच्याकडे प्रचंड आशेने बघितले जाते, त्याच ठिकाणी सुरू असलेला हा गोंधळ या क्षेत्राला धक्का देणारे ठरले.

प्रगती जाधव पाटील

Web Title: No business in Corona ... service required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.