फलटण तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या घटेना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:00+5:302021-05-24T04:38:00+5:30

फलटण : फलटण तालुक्यात दररोजची कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची साखळी काही केल्या तुटता तुटेनाशी झाली असून, प्रशासनाच्या कागदी ...

No corona outbreak in Phaltan taluka. | फलटण तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या घटेना..

फलटण तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या घटेना..

googlenewsNext

फलटण : फलटण तालुक्यात दररोजची कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची साखळी काही केल्या तुटता तुटेनाशी झाली असून, प्रशासनाच्या कागदी उपाययोजना फोल ठरल्या आहेत. तालुक्याची चिंताजनक परिस्थिती पाहता आता प्रशासनाने कागदी घोडे नाचविणे थांबवून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

फलटण तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दररोज तीनशे ते चारशेच्या घरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या राहत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यांत रुग्णसंख्या कमी होत असताना फलटण तालुक्यात रुग्णसंख्या ‘जैसे थे’ राहिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या एक महिन्यापासून फलटण तालुक्यातील सर्व व्यवहार बंद असून, स्थानिक पातळीवर कडक उपाययोजना आणि कडक लॉकडाऊन करूनही परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. आजअखेर वीस हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून, शासकीय आकडेवारीनुसार २५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे दाखविले असले तरी ही शासकीय आकडेवारी फसवी असल्याचे रोजचा मृत्यूदर पाहता दिसून येत आहे. फलटण तालुक्यात दररोज दहा ते पंधरा जणांचा मृत्यू होत आहे. मात्र, प्रशासन मृत्यूदर लपवीत असल्याने यामागचे गौडबंगाल समजेनासे झाले आहे.

फलटण शहरात सकाळच्या वेळेस भाजी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असून, नगरपालिकेचे अधिकारी, कामगार गर्दी पांगविताना दिसत असले तरी गर्दी काही कमी होईनाशी झाली आहे. बँका आणि लस घेण्यासाठीही मोठ्या रांगा दिसत आहेत. लॉकडाऊनला जनता कंटाळली असून, रस्त्यावर येऊ लागल्याने संख्या वाढत आहे. फलटण तालुक्यातील अनेक गावांत व शहरांमध्ये व्यवहार बंद असल्याचा फायदा उठवीत गल्लीबोळांतून मुले, तरुण विनामास्क क्रिकेट खेळताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी गर्दी करून गप्पांचा फड रंगल्याचे चित्र आहे. पोलीस आल्यास तात्पुरते क्रिकेट थांबविले जात असून, या मुलांना अडविण्याची मानसिकता त्यांचे पालक दाखवीत नसल्याने कोरोना वाढण्यामागचे हेही एक प्रमुख कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासन केबिनमध्ये बसून नुसते आदेश काढण्यात मग्न आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आणि फिरून त्यांनी पाहणी करणे आवश्यक असल्याचे जनतेमधून बोलले जात आहे.

(चौकट)

अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याची चर्चा..

फलटण तालुक्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही, तसेच रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या असताना तालुक्यात अद्याप पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी फिरकलेच नसल्याचे दिसून येत आहे. यांनाच गांभीर्य नसल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

चौकट..

अधिकाऱ्यांचेच सोशल डिस्टन्स

फलटण तालुक्याशेजारी असणाऱ्या बारामती तालुक्यात प्रचंड मोठी कोरोना रुग्णसंख्या होती. मात्र, तिथे प्रशासनाने रस्त्यावर उतरून काम केल्याने १५ दिवसांत रुग्णसंख्या कमी झाली आहे. याउलट फलटण तालुक्यात एकही अधिकारी रस्त्यावर उतरून ऑन फिल्ड काम करताना दिसत नाही. नुसते कागद रंगविले जात असून, बैठकांचा फार्स सुरू आहे. त्याऐवजी रस्त्यावर उतरून परिस्थिती जाणून घेतली आणि तशी उपाययोजना केली तर कोरोनाची रुग्णसंख्या कमी होईल.

Web Title: No corona outbreak in Phaltan taluka.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.