ना निवडणूक ना आचारसंहिता.. तरी बाजार बंद
By Admin | Published: August 4, 2015 11:21 PM2015-08-04T23:21:45+5:302015-08-04T23:21:45+5:30
शेतकऱ्यांकडून निषेध : पोलिसांनी शेतीमाल रस्त्यावर फेकल्याचा आरोप
पाचवड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचे कारण पुढे करून पाचवड, ता. वाई येथील आठवडे मंगळवारी बाजार बंद पाडण्यात आला. कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने मंगळवारचा आठवडा बाजार व जनावरांचा बाजार बंद पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी कृषिमाल रस्त्यावर फेकून दिला आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांना या प्रकाराचा निषेध केला आहे.जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. ज्या गावामध्ये निवडणूक आहे, त्या गावातच कोणताही कार्यक्रम अथवा आठवडे बाजार घेऊ नयेत, असा आदेश आहेत. पाचवडची कोणतीही निवडणूक नसताना महसूल खात्याने आठवडा बाजार बंद पाडल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. वाई तालुक्यामध्ये पाचवडच्या आठवडा बाजाराला महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी-विक्रीचे हमखास ठिकाण म्हणून पाचवडचा आठवडा बाजार प्रसिध्द आहे. त्यामुळे येथे प्रत्येक बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. पाचवडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदान मंगळवारी होत असून पाचवडमध्ये मात्र या निवडणुकीचा कोणताही संबंध नाही. शेतकऱ्यांना भाजीपाला मंगळवारी पाचवडमध्ये घेऊन न येण्याची कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानक आचारसंहितेच्या नावाखाली मंगळवारी सकाळपासूनच भाजीबाजार व फळबाजार बंद पाडण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातून आलेले सर्व व्यावसायिक व शेतकरी यांच्या शेतमालाचे व फळांचे अतोनात नुकसान झाले. काही शेतकरी बाजारात बसून माल विक्री करीत असताना अचानक आलेल्या पोलिसांनी भाजीपाला इतरत्र फेकून दिला. याचा जाब विचारला असता निवडणूक आचारसंहितेचे आदेश व कारण पुढे करण्यात आले. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येवून शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांनी महागाई व दुष्काळाचे सावट याचा सामना करून आणलेला शेतीचा माल हा कवडीमोलाने कुठे विक्रीस न्यायचा या विचाराने शेतकरी गर्भगळीत झाले. या सर्व घडलेल्या प्रकाराची योग्य ती दखल घऊन प्रशासनाने संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी करू लागले आहेत. (वार्ताहर)
पोलिसांनी भाजीपाला फेकला
शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठेत ठेवला असता त्याठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन शेतकऱ्यांचा माल अस्ताव्यस्त करून दमदाटी केली. आचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा पाचवड बाजारपेठेतील शेतकरी व व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.