ना सर्वसाधारण सभा... ना स्थायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:58+5:302021-07-29T04:38:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनामुळे सातारा पालिकेची आर्थिक घडी विस्कटली असतानाच आता विकासकामांवरही काहीसा परिणाम होऊ लागला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनामुळे सातारा पालिकेची आर्थिक घडी विस्कटली असतानाच आता विकासकामांवरही काहीसा परिणाम होऊ लागला आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत सातारकरांच्या विकासकामांना मंजुरी देणाऱ्या पालिकेच्या केवळ तीनच सर्वसाधारण सभा झाल्याने विकासकामांवर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. शेवटच्या क्षणाला सर्वसाधारण व स्थायीची सभा रद्द होत असल्याने आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी झाली की काय? अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागली आहे.
पालिका निवडणुकीला साडेचार वर्षांचा कालावधीत पूर्ण झाला असून, आगामी निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासून राजकीय पक्षांची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सातारा पालिकेतील सत्तारुढ सातारा विकास आघाडीने आघाडी प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा वचननाम्याप्रमाणे विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. ग्रेड सेपरेटर, कास धरण उंची, पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजना अशा महत्त्वाच्या कामांना त्यांनी गती दिली. मात्र, कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षात पालिकेच्या केवळ तीनच सर्वसाधारण सभा झाल्याने विकासकामे मार्गी लावण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत.
नगरपालिका अधिनियमाप्रमाणे पालिकेची महिन्याला एक सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे. मात्र, जानेवारी २०२० ते जुलै २०२१ या दीड वर्षाच्या कालावधीत झालेल्या दहा सभांपैकी केवळ तीनच सभा सर्वसाधारण होत्या तर चार विशेष सभा या स्वीकृत नगरसेवक, सभापती व उपनगराध्यक्ष निवड तर एक विशेष सभा ही पालिकेच्या बजेट मंजुरीची होती. पालिकेची शेवटची ऑनलाईन सर्वसाधारण सभा दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली तर दि. ८ एप्रिलची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. दि. २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली स्थायी समितीची सभादेखील कोरमअभावी रद्द करण्यात आली. या सभेची पूर्वकल्पना दिलेली असतानाही शेवटच्या क्षणी अनेक पदाधिकाऱ्यांनी सभेला दांडी मारली. पालिकेच्या सभा जर वेळेवर झाल्या तरच सातारा शहरातील विकासकामे वेळेत मार्गी लागतील. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने सभा रद्द होत आहेत. आगामी सर्वसाधारण सभेलाही अद्याप मुहूर्त न मिळाल्याने विकासकामे मार्गी लावण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे असणार आहे.
(चौकट)
अनेक कामे रखडली
जलतरण तलाव अद्ययावतीकरण, शहरातील मंडईचे प्रशस्तीकरण, रस्ता रुंदीकरण व पॅचिंग, पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे फेरलिलाव, खुल्या जागांची भाडे निश्चिती, नवीन प्रशासकीय इमारत तसेच हद्दवाढीत नव्याने समाविष्ठ झालेल्या भागात मुलभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. मात्र, सभाच होत नसल्याने ही विकासकामे मार्गी लावण्यावर मर्यादा आलेल्या आहेत.
(पाईंटर)
- सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचा अंतर्भाव केला जातो.
- सभेत मंजुरी मिळाल्यानंतर अशा विकासकामांचा मार्ग मोकळा होतो व ती मार्गी लावली जातात.
- सभा न झाल्याने सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांच्या प्रभागातील बहुतांश कामे लांबणीवर पडली आहेत.
- आगामी पालिका निवडणुकीला सामोरे जाताना नगरसेवकांपुढे अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो.
- जर कामेच झाली नाहीत तर जनतेपुढे जायचं तरी कसं, असा प्रश्नदेखील अनेकांना सतावू शकतो.
लोगो : सातारा पालिका फोटो