तरी नाही धीर सोेडला... खेळ मांडला !

By Admin | Published: March 2, 2015 11:36 PM2015-03-02T23:36:34+5:302015-03-03T00:31:35+5:30

साताऱ्याचा बळीराजा जिगरबाज : अवकाळीपुढं न झुकता उरलं-सुरलं पीक वाचविण्यासाठी ठाकला उभा

No, I do not want to be ... | तरी नाही धीर सोेडला... खेळ मांडला !

तरी नाही धीर सोेडला... खेळ मांडला !

googlenewsNext

सातारा : शेतकऱ्यानं निसर्ग कोपापुढं झुकायचं नसतं. कारण संकटावर मात करून मातीतून सोनं उगविण्याची क्षमता फक्त बळीराजातंच असते... कालच्या अवकाळीनं उद्ध्वस्त केलेल्या शिवाराकडं पाहात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हीच भावना जिवंत झाल्याचे चित्र आज (सोमवार) सर्वत्र पाहायला मिळाले. कुणी ज्वारीची कणसं खुडून वाळवण टाकलं तर कुणी हळदीला सुकविण्याचा आटापिटा केला. कुणी कांद्याच्या ऐरणी उघड्या केल्या तर कुणी चिखल वाळण्याची प्रतीक्षा केली. आपत्तीसमोर न झुकता बळीराजानं स्वत:ला सावरत पिकाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. निसर्गानं कितीही खेळ मांडला तरी धीर नाही सांडला.. असंच चित्र आज जिकडेतिकडे पाहायला मिळाले. (लोकमत टीम)
भिजलेल्या स्ट्रॉबेरीला बल्बची ऊब
पाचगणी : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरी पीक पाण्याखाली गेले होते. त्यामुळे फळांचे नुकसान झालेच; पण यातून सावरत शेतकऱ्यांनी ओली झालेली स्ट्रॉबेरी सुकवून त्याची विक्री केली. तोडणीस आलेली फळे पाण्यात गेली तर काही मातीत. पॉलिथीनच्या पेपरमुळे जी स्ट्रॉबेरी वाचली ती एकत्र करून शेतकऱ्यांनी बंदिस्त शेडमध्ये पसरून ठेवली होती. ओली स्ट्रॉबेरी हलक्या हाताने पुसून बल्बच्या प्रकाशात सुकवून ती बॉक्समध्ये भरली जात होती.
स्ट्रॉबेरी २२ रुपये किलो!
तालुक्यातील भोसे, भिलार, पांगारी, गुरेघर, भोसे, राजपुरी, खिंगर, बोंडारवाडी ,घोटेघर, हरोशी आदी भागात स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. जी स्ट्रॉबेरी साठ रूपये किलो दराने विकली जात होती, ती भिजल्यामुळे वीस-बावीस रुपये किलोने विकावी लागली. भिजलेली हळद पसरण्यात कुटुंब दंग
भुर्इंज : आदल्या दिवशी अश्रू ढाळणाऱ्या शेतकऱ्यांनी गाठलं पुन्हा शिवार
भुर्इंज : एक पीक वाया गेलं म्हणून शेतकरी हार माणत नाही. तो नव्या दमाने पुन्हा उभा राहतो, अशाच काही शब्दात आपल्या भावना व्यक्त करुन भिजलेलं रान सावरण्यासाठी भुर्इंज परिसरातील शेतकऱ्यांनी कंबर कसल्याचेच चित्र आज दिवसभरात दिसून आले. विशेषत: हळद या नगदी पिकाचे मोठे नुकसान होऊनही या पिकाला जगवण्यासाठी बळीराजांची दिवसभर धावपळ सुरू होती.
भुर्इंज परिसर खरं तर बागायती. तरीही या बागायती परिसरावर पावसाने घाला घातला. उभी पिकं अक्षरश: आडवी झाली. हळदीचे पीक तर काढून झाले होते आणि ते पॉलिश करुन वाळवत ठेवले होते. मात्र पावसामुळे त्या पिकाचेही नुकसान झाले.
पावसामुळे हळदीचा रंग, दर्जा, वजन या साऱ्याच दराशी निगडीत असणाऱ्या बाबींना फटका बसला. ज्या हळदीला क्विंटलला १0 हजार रुपये भाव मिळणार होता तेथे आता ७ हजार मिळण्याची अपेक्षा आहे.
दत्तात्रय भोसले पाटील यांनी आज कंबर कसून पुन्हा भुईखालून भिजलेली हळद उलटवून पुन्हा वाळवण्यासाठी दिवसभर आटापिटा केला. या कामात त्यांना कुटुंबीयांचेही हातभार लावला. पुन्हा पाऊस पडेल की नाही माहिती नाही. पण तो पडणारच नाही याची खात्री बाळगून त्यांनी हे काम सुरु केले. या नुकसानीने दु:ख झाले पण शेतकऱ्याला दु:ख करण्याचा अधिकार नाही, असे त्यांचे म्हणणे.
दरम्यान, पुन्हा कंबर कसून नव्याने खेळ मांडणाऱ्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची आज मांदियाळीच भुर्इंज परिसरात दिसून आली. (वार्ताहर)


पूर्वीच्या काळी तर ऐन सुगीत घरात दु:खद घटना घडली तर एकरभरचा मालक दु:ख झाकून सुगी मार्गी लावायचा. त्यामुळे आता का एवढं रडत बसायचं? शेतकऱ्यानं दु:ख करायचं नसतं.
- दत्तात्रय भोसले-पाटील, शेतकरी


बळीराजाची जिद्द पाहून ऊनही खुदकन हसलं
मलकापूर : कोणतीही आपत्ती म्हटलं की पहिल्यांदा शेतकरीच संकटात सापडतो. अशा अनेक संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्यही केवळ शेतकऱ्यांकडेच आहे. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने नुकसान झाले म्हणून रडत बसण्यापेक्षा सोमवारी ऊन पडताच शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला.
मलकापूर येथे आडव्या पडलेल्या शाळूच्या पिकात वाळलेली कणसे शेतकरी खोडत आहेत. चचेगाव येथील गुऱ्हाळावरील कर्मचाऱ्यांनी सोमवारी चिपाडं उन्हात पसरली.
संकट ओढावूनही शेतकरी सोमवारी सकाळपासूनच पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. पावसाने उघडीप दिल्यामुळे ते सकाळीच शेतात पोहोचले. पिकांच्या काढणीचे काम सुरू केले. तर काढून टाकलेल्या ज्वारीची कणसे खोडून कडबा कसा निवाऱ्याला जाईल याची तजवीज सुरू केली. शिजवलेली हळद ऊन पडताच मिळेल त्या ताडपत्रीवर पसरून ती लवकरात लवकर कशी वाळेल, या दृष्टीने शेतकऱ्यांनी हळद उन्हात घातली. त्याचबरोबर गहू दिवसभर वाळवून लागलीच मळणीसाठीही घेतला होता.
काशिळ : अवकाळीमुळे काशीळसह परिसरातील वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विटांची माती होऊन चिखलाचे ढीग तयार झाले होते. आज वीट कामगारांचा दिवस माती सुकण्याची वाट पाहण्यात गेला.

Web Title: No, I do not want to be ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.