आता ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:26+5:302021-06-30T04:25:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा जाणवला. केंद्र शासनाच्या योजनेतून स्व. क्रांतिसिंह नाना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा जाणवला. केंद्र शासनाच्या योजनेतून स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसविण्यात आला आहे. या प्लांटमधून तयार होणारा ऑक्सिजन हा रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ऑक्सिजन प्लांट उभे करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीकडून ऑक्सिजन निर्मितीची माहिती घेतली.
या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपअभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते.
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन प्लांटमुळे दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कूपर, कमिन्सकडून नाममात्र किमतीत १९ जनरेटर
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयासह १९ ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभे करण्यात आले आहेत. या प्लांटचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून कूपर काॅर्पोरेशन प्रा.लि. व कमिन्स कंपनी यांनी नाममात्र किमतीत १९ जनरेटर दिले आहेत. ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पांमुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असेही पालकमंत्री पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.
फोटो नेम : २९डीआयओ
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.