म्हासुर्णे-मोहितेमळा भागातील राज्यमार्गाला कोणी ना वाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:35+5:302021-07-03T04:24:35+5:30
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील म्हासुर्णे ते मोहितेमळा या सुमारे तीन किलोमीटर अंतराच्या मार्गावर अनेक वर्षांपासून चिखल व ...
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील म्हासुर्णे ते मोहितेमळा या सुमारे तीन किलोमीटर अंतराच्या मार्गावर अनेक वर्षांपासून चिखल व खड्ड्यांची मक्तेदारी आहे. त्यामुळे या मार्गाला कोणी वाली आहे का? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक करीत आहेत.
याबाबत माहिती अशी की, मल्हारपेठ-पंढरपूर हा राज्यमार्ग सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतून जात आहे. हा मार्ग जवळजवळ एकशे साठ किलोमीटर लांबीचा आहे. या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम मायणीपासून पंढरपूरकडे जवळजवळ शंभर किलोमीटर पूर्णत्वाकडे नेले आहे. मात्र मायणीपासून पश्चिमेला मल्हारपेठपर्यंत या मार्गाची अवस्था ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी काहीशी झाली आहे.
म्हासुर्णे ते मोहिते मळा या सुमारे चार किलोमीटर अंतराच्या राज्यमार्गावर खड्ड्यांचे मोठे साम्राज्य पसरले आहे. साईटपट्ट्याही खचल्या आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये व साईडपट्टीवर पाणी साठत असल्याने संपूर्ण परिसरामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून या मार्गाच्या रुंदीकरणाकडे संबंधित विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वेळी फक्त खड्डे भरून हे एकच काम केले जात आहे. त्यामुळे या मार्गाला कोण वाली आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांसह वाहनचालक विचारत आहेत.
चौकट
गतवर्षी या मार्गावरील म्हासुर्णे गावाशेजारील काही भाग, निमसोड फाटा येथील काही भाग व मोहिते मळा शेजारील काही भाग संबंधित विभागाने खडीकरण व डांबरीकरण करुन व्यवस्थित केला होता. मात्र ज्या ठिकाणी हा भाग व्यवस्थित केला त्यालगत असलेला जुना राज्य मार्गाच्या भागावर व दुरुस्ती केलेल्या भागात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
चौकट :
मल्हारपेठ-पंढरपूर हा राज्यमार्ग सुमारे १६० किलोमीटरचा आहे. मात्र या राज्यमार्गातील खटाव तालुक्यातील पवारमळा, गुंडेवाडी, चितळी (मोहितेमळा), म्हासुर्णे, चोराडे फाटा व शामगाव घाट परिसरामध्ये कित्येक वर्षापासून राज्यमार्ग एकेरी, मार्गावर खड्डे, साईडपट्ट्या खचलेल्या असाच आहे.
चौकट
मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावरील यलमरवस्ती, पवारमळा ते गुंडेवडी या सुमारे चार किलोमीटर अंतरावर पावसामुळे या मार्गाच्या साईडपट्ट्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. अनेक वाहने चिखलात अडकत होती. याबाबत आवाज उठवल्यानंतर या परिसरातील गुंडेवडी ग्रामस्थांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन दिले. या मार्गाचे मार्गावरील साईडपट्ट्या संबंधित ठेकेदाराकडून व्यवस्थित केल्या.
०२मायणी
म्हासुर्णे ते मोहितेमळा-चितळी दरम्यानच्या मार्गावर असे खड्डे पडले आहेत. शिवाय साईडपट्ट्याही खचल्या आहेत. (छाया : संदीप कुंभार)