पाटण नगरपंचायत निवडणूक : दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 04:37 PM2021-12-03T16:37:56+5:302021-12-03T16:39:17+5:30
शुक्रवार व सोमवार, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २१ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान व २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
रामापूर : पाटण नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू झाली असली तरी, गुरुवारी दुसऱ्या दिवशीही कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. आता शुक्रवार व पुढच्या आठवड्यातील सोमवार, मंगळवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. शनिवार, रविवारी सुटी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील गाढे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली.
पाटण नगरपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी एक डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू केली. बुधवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता, तर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही. शुक्रवार व सोमवार, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
पाटण नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सतरा प्रभागांसाठी आरक्षणही जाहीर झाले असून सतरापैकी तब्बल नऊ ठिकाणी महिला उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या नऊ महिलांमध्ये सर्वसाधारण पाच, इतर मागासवर्गीय दोन व अनुसूचित जाती दोन महिलांचा समावेश आहे. उर्वरित आठ प्रभागात चार ठिकाणी सर्वसाधारण, दोन इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक उमेदवार निवडून द्यायचा आहे.
मंगळवारी सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. आठ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, तर १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागेे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान व २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.