आठवडी बाजारात कोणाला नाही कोरोनाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:40+5:302021-01-22T04:35:40+5:30
रहिमतपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला रहिमतपूर येथील आठवडी बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. व्यापारी, ग्राहक, भाजीपाला विक्रेत्यांना सॅनिटायझर ...
रहिमतपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला रहिमतपूर येथील आठवडी बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. व्यापारी, ग्राहक, भाजीपाला विक्रेत्यांना सॅनिटायझर व मास्कचा वापर अनिवार्य केला असला तरी व्यापारी व ग्राहकांची विनामास्क गर्दी होत आहे. ही बाब धोकादायक ठरू शकते.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आलेल्या अनेक ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आठवडी बाजार भरवण्यास सुरुवात झाली होती. मात्र, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरसारख्या काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून आठवडी बाजार भरवण्यास सुरुवात केली नव्हती. रहिमतपूर येथील अनेक व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांकडून आठवडी बाजार सुरू करावा, अशी मागणी होत होती.
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे नगरपरिषदेकडून ३१ डिसेंबरपासून आठवडी बाजार भरवण्यास परवानगी देण्यात आली. रहिमतपूर येथील गांधी चौकामध्ये गुरुवारी भरलेल्या आठवडी बाजाराला तोबा गर्दी झाली होती. रहिमतपूरसह साप, वेळू, बेलेवाडी, पिंपरी, न्हावी बुद्रुक, पवारवाडी, सुर्ली, सायगाव, धामणेर, बोरीव, दुघी, सासुर्वे, रंगनाथ स्वामींची निगडी आदी गावांतील शेतकरी, व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी होते. परंतु बहुतांशी व्यापारी, भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांच्याकडे मास्क व सॅनिटायझरचा अभाव दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला परंतु अद्याप थांबलेला नाही. जिल्ह्यातील खेडोपाड्यात काही प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. अशा परिस्थितीत योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. बेफिकीर वागण्यामुळे प्रसार वाढल्यास जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच पालिका प्रशासनाचीही डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी नगरपालिका प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून योग्य ती ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
चोैकट :
अन्यथा दंडात्मक कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आठवडी बाजार बंद ठेवला होता. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र व्यापारी, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी. सर्वांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बाजारपेठेमध्ये जावून व्यापारी व ग्राहकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी दिला आहे.
फोटो २१ रहिमतपूर मार्केट
रहिमतपूर येथील आठवडी बाजारात विनामास्क व्यापारी, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांची तोबा गर्दी झाली होती. (छाया : जयदीप जाधव)