एकही रुग्ण उपचाराविना राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:33 AM2021-05-03T04:33:09+5:302021-05-03T04:33:09+5:30
दहिवडी : ‘गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेपासून कोरोनाविरुद्धची लढाई मैदानात उतरून लढत आहे. आता दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या खूप ...
दहिवडी : ‘गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेपासून कोरोनाविरुद्धची लढाई मैदानात उतरून लढत आहे. आता दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या खूप मोठी आहे. त्यात दररोज भर पडत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी मतदारसंघातील एकही बाधित रुग्ण उपचाराविना राहू नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत,’ असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
दहिवडी येथे नगरपंचायत, आरोग्य आणि महसूल विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या कोरोना उपचार केंद्राच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अवधूत कुंभार, नगराध्यक्ष धनाजी जाधव, उपनगराध्यक्ष शिंदे, डॉ. कोडलकर, माजी नगराध्यक्ष सिद्धार्थ गुंडगे आणि नगरसेवक उपस्थित होते.
माण तालुक्यातील दररोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता आमदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून दहिवडी येथील मुलींच्या वसतिगृहात २५ ऑक्सिजन आणि ५० सर्वसाधारण बेड्सचे उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाधित रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी आमदारांसह नगरपंचायत, आरोग्य आणि महसूल विभाग कार्यरत राहणार आहे. या कोरोना उपचार केंद्राची पाहणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली. ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली.
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपंचायतीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक आणि आमदारांचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून इतर जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.
०२दहिवडी
दहिवडी येथील नगरपंचायत, आरोग्य महसूल विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या कोरोना उपचार केंद्राच्या प्रारंभप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, मुख्याधिकारी कुंभार आदी उपस्थित होते.